कोलाड | विश्वास निकम
पहूर गावातील हरवलेल्या व्यक्तीचा शोध सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था (SVRSS) यांच्या ड्रोन मोहिमेमुळे यशस्वी ठरला आहे. हरवलेले वृद्ध बाळाराम गंगाराम पवार (वय ७० वर्षे, रा. पहूर) यांचा मृतदेह गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या धरण परिसरात आढळून आला.
रविवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास पवार हे कोणालाही काही न सांगता घरातून बाहेर पडले होते. दिवसभर त्यांचा काहीच पत्ता लागला नसल्याने संध्याकाळी सहा वाजता त्यांच्या घरच्यांनी गावकऱ्यांना माहिती दिली. तत्काळ ग्रामस्थांनी मिळून रात्री उशिरापर्यंत सखोल शोधमोहीम राबवली; मात्र काहीच ठसे न मिळाल्याने ग्रामपंचायतीमार्फत SVRSS संस्थेला मदतीची विनंती करण्यात आली.
सोमवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता SVRSS पथकाने ड्रोनच्या सहाय्याने शोधकार्य सुरू केले. अवघ्या पाच मिनिटांच्या पहिल्याच टेक-ऑफमध्ये धरण परिसरात मृतदेह आढळून आला.
या मोहिमेत स्थानिक ग्रामस्थ, ग्रामपंचायत व SVRSS टीमचा सक्रिय सहभाग होता. पुढील तपास कोलाड पोलिस ठाण्याचे पथक करीत आहे.
