अलिबाग तालुक्यातील मुनवली येथे साडेसहा कोटींना तीन विकसित भूखंडांची खरेदी
अलिबाग │ प्रतिनिधी
बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनाही अलिबागच्या नैसर्गिक सौंदर्याची आणि गुंतवणुकीच्या संधींची भुरळ पडली आहे. शाहरुख खान, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा, अक्षय खन्ना, राम कपूर आणि क्रिती सॅनन यांच्या पावलावर पाऊल ठेवत बिग बींनी अलिबाग तालुक्यातील मुनवली येथे तीन विकसित भूखंड खरेदी केले आहेत.
ही खरेदी व्यवहाराची नोंद अलिबाग येथील दुय्यम निबंधक कार्यालयात नुकतीच करण्यात आली असून, या तीन भूखंडांसाठी अमिताभ बच्चन यांनी तब्बल ६ कोटी ५९ लाख रुपये मोजले आहेत. या व्यवहारासाठी ३९ लाख ५८ हजार रुपये मुद्रांक शुल्क आणि ९० हजार रुपये नोंदणी शुल्क भरले आहे.
तीन स्वतंत्र भूखंडांचा समावेश
अमिताभ बच्चन यांनी घेतलेल्या भूखंडांपैकी
- पहिला भूखंड – ३,७६० चौ.फुट (मूल्य ₹२.७९ कोटी)
- दुसरा भूखंड – २,५८० चौ.फुट (मूल्य ₹१.९२ कोटी)
- तिसरा भूखंड – २,५४० चौ.फुट (मूल्य ₹१.८८ कोटी)
असे एकूण ८,८८० चौ.फुट क्षेत्रफळाचे तीन विकसित भूखंड आहेत. त्यामुळे आता बिग बी अधिकृतपणे ‘अलिबागकर’ बनले आहेत.
गुंतवणुकीसाठी अलिबागचे वाढते आकर्षण
गेल्या काही वर्षांत अलिबाग हे फक्त पर्यटनस्थळ न राहता राजधानी मुंबईजवळील प्रमुख गुंतवणुकीचे केंद्र बनले आहे. मुंबई–अलिबाग दरम्यान सुरू असलेली बारमाही सागरी रो-रो वाहतूक सेवा, अटल सेतू, आणि सुरू झालेले रेवस–करंजा पूल या प्रकल्पांमुळे मुंबईहून अलिबागला जाण्याचा प्रवास तीन तासांवरून फक्त एका तासावर आला आहे. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, आणि जलद पायाभूत सुविधा यामुळे या परिसरात गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. परिणामी, अलिबागमधील जमिनींचे दर झपाट्याने वाढले असून गेल्या वर्षी रायगड जिल्ह्यातून तब्बल साडेतीन हजार कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क जमा झाले.
मोठ्या कंपन्यांचे भव्य प्रकल्प
अलिबागच्या विकासात आता देश–विदेशातील प्रतिष्ठित बांधकाम कंपन्यांचाही सहभाग वाढत आहे.
- एम्मार कंपनी (बुर्ज खलिफा बांधणारी) — ‘कासा वेनेरो’ नावाचा ८० आलिशान बंगल्यांचा प्रकल्प सुरू
- लोढा समूह — ‘हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ आणि ‘भास्करन वॉटरफ्रंट’ सोळा मजली प्रकल्प
- हिरानंदानी समूह — नागाव येथे टाऊनशिप प्रकल्प
- महिंद्रा मेरिडियन आणि ओबेरॉय रिएल्टी — टेकाळी येथे ८१ एकर जागेत १५० हून अधिक आलिशान बंगले उभारणीसाठी
या सर्व गुंतवणुकींमुळे अलिबाग आता मुंबईच्या ‘लक्झरी सिटी झोन’च्या यादीत स्थान मिळवत आहे.
