उरण | अनंत नारंगीकर
उरण पंचायत समितीच्या आठ गणांच्या आणि चार जिल्हा परिषद गटांच्या आरक्षण सोडतीची प्रक्रिया आज (१३ ऑक्टोबर) पार पडली. पंचायत समिती सभागृहात झालेल्या या सोडत प्रक्रियेला उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) अश्विनकुमार सोनुने आणि तहसीलदार उद्धव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडण्यात आले.
या आरक्षण सोडतीनंतर उरण तालुक्यातील पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद निवडणुकीचे राजकीय चित्र स्पष्ट झाले असून, सर्वच पक्षांनी आता मोर्चेबांधणीस वेग दिला आहे.
पंचायत समिती आठ गणांचे आरक्षण पुढीलप्रमाणे :
| प्रभाग क्र. | गणाचे नाव | आरक्षणाचा प्रवर्ग |
|---|---|---|
| ५१ | नवघर | ना. म. प्र. (सर्वसाधारण) |
| ५२ | भेंडखळ | सर्वसाधारण |
| ५३ | जासई | सर्वसाधारण (स्त्री) |
| ५४ | चिरले | ना. म. प्र. (स्त्री) |
| ५५ | केगाव | सर्वसाधारण |
| ५६ | चाणजे | सर्वसाधारण |
| ५७ | चिरनेर | सर्वसाधारण (स्त्री) |
| ५८ | आवारे | सर्वसाधारण (स्त्री) |
या सोडतीनंतर पंचायत समितीच्या आठ गणांपैकी चार ठिकाणी महिला आरक्षण पडले असून, आगामी निवडणुकीत महिलांचे वर्चस्व वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
| गटाचे नाव | आरक्षणाचा प्रवर्ग |
|---|---|
| चिरनेर | ना. म. प्र. (नागरिकांचा मागास प्रवर्ग) |
| नवघर | सर्वसाधारण (स्त्री) |
| चाणजे | सर्वसाधारण (स्त्री) |
| जासई | ना. म. प्र. (नागरिकांचा मागास प्रवर्ग) |
राजकीय समीकरणांमध्ये हालचाल
या आरक्षण घोषणेनंतर उरण तालुक्यातील राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. अनेक संभाव्य उमेदवारांनी आपल्या गणानुसार प्रचारयोजना आणि जनसंपर्क मोहीम सुरू केली आहे.
तालुक्यातील प्रमुख राजकीय पक्ष — शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांनी आगामी निवडणुकीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
या आरक्षणामुळे अनेक ठिकाणी विद्यमान सदस्यांना धक्का बसला असून, नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. उरण तालुक्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत त्यामुळे यंदा तीव्र चुरस पाहायला मिळणार आहे.
