माणगाव | सलीम शेख
माणगाव पंचायत समिती निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत तहसीलदार कार्यालयात पार पडली. भौगोलिकदृष्ट्या विस्तृत असलेल्या माणगाव तालुक्यात पंचायत समितीचे एकूण आठ गण असून जिल्हा परिषदेचे चार मतदारसंघ आहेत. या सर्व जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन प्रमुख पक्षांनी तालुक्यात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे माणगावातील निवडणूक रंगणार असून या दोन्ही पक्षांमध्ये थेट चुरस होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सभापती पदासाठी ‘नागरिकांच्या मागास प्रवर्गा’चे आरक्षण
माणगाव पंचायत समिती सभापतीपदासाठी नागरिकांच्या मागास प्रवर्ग (OBC) या वर्गासाठी आरक्षण यापूर्वीच जाहीर झाले आहे. त्यामुळे सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटातील इच्छुक उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या आरक्षणात अनेक अनुभवी आणि इच्छुक उमेदवारांचे ‘पत्ते कट’ झाले असून, या बदलामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे पुन्हा बदलण्याची चिन्हे आहेत.
रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण वर्गाचे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे जिल्हा स्तरावरही नव्या राजकीय गठजोडी आणि समीकरणांची शक्यता आहे.
मागील राजकीय पार्श्वभूमी : शिवसेना आणि राष्ट्रवादीची अदलाबदल
माणगाव पंचायत समितीत गेल्या दोन कार्यकाळांत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे सभापती झाले आहेत. युती तुटल्यानंतर काही काळ शिवसेनेचे, तर नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती निवडून आले.
गेल्या पाच वर्षांत तालुक्याच्या राजकारणात मोठे बदल झाले आहेत. शिवसेनेचे नेते ॲड. राजीव साबळे यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद निश्चितच वाढली आहे. साबळे यांनी शिवसेनेत असताना तीन जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
चुरशीच्या लढतींची चिन्हे
माणगाव तालुक्यातील निजामपूर आणि गोरेगाव हे जिल्हा परिषद मतदारसंघ मंत्री भरत गोगावले यांच्या मतदारसंघात येतात, तर मोर्बा आणि तळाशेत-इंदापूर हे मतदारसंघ मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यक्षेत्रात आहेत. त्यामुळे या सर्वच मतदारसंघांमध्ये तीव्र राजकीय चुरस अपेक्षित आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी महायुतीबाबत संयमी भूमिका घेतली आहे; तर मंत्री भरत गोगावले यांनी स्पष्टपणे “महायुती होणार नाही” अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे माणगाव तालुक्यात तरी महायुती शक्य नसल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.
तथापि, जिल्हास्तरावर भारतीय जनता पक्ष महत्त्वाची भूमिका बजावून भविष्यात महायुतीचा झेंडा ‘शिवतीर्थावर’ फडकवू शकतो, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. तोवर या निवडणुकीत मात्र कार्यकर्ते समोरासमोर झुंजताना दिसणार आहेत.
माणगाव तालुक्यातील आरक्षण तपशील :
१) निजामपूर मतदारसंघ
जि.प. – सर्वसाधारण
पं.स. निजामपूर – अनुसूचित जमाती
पं.स. पाटणूस – ना.म.प्र. (खुला)
२) गोरेगाव मतदारसंघ
जि.प. – अनुसूचित जाती
पं.स. लोणेरे – सर्वसाधारण
पं.स. गोरेगाव – महिला (सर्वसाधारण)
३) मोर्बा मतदारसंघ
जि.प. – सर्वसाधारण
पं.स. मोर्बा – महिला (सर्वसाधारण)
पं.स. वडवली/मांजरवणे – सर्वसाधारण
४) तळाशेत मतदारसंघ
जि.प. – महिला (सर्वसाधारण)
पं.स. तळाशेत – ना.म.प्र. महिला
पं.स. साई – महिला (सर्वसाधारण)
