राष्ट्रवादीच्या नेत्या भावना घाणेकर यांचा गंभीर आरोप — तहसीलदारांकडे हरकती दाखल
उरण | विठ्ठल ममताबादे
उरण विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर बोगस नावे आढळत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा भावना घाणेकर यांनी केला आहे. त्यांनी सोमवारी उरण तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार उद्धव कदम यांची भेट घेऊन या संदर्भात हरकती दाखल केल्या.
भावना घाणेकर यांनी तहसीलदारांकडे सुमारे साडेअकराशे पानांची मतदारांची यादी सादर केली असून, त्यामध्ये विधानसभा निवडणुकीपर्यंत असलेल्या डुप्लिकेट, हटवलेले आणि नव्याने जोडलेले मतदार यांची सविस्तर नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या मते, उरण मतदारसंघात तब्बल ६० हजारांहून अधिक मतदार बोगस असल्याची शक्यता आहे.
“आक्षेप आणि सूचना नोंदविण्याची अंतिम तारीख असल्याने आम्ही आज तहसीलदारांकडे अधिकृतपणे हरकती नोंदवल्या आहेत. मतदार यादीतील गंभीर अनियमितता दुरुस्त न झाल्यास लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे राहील,” असे घाणेकर यांनी सांगितले.
तहसीलदार उद्धव कदम यांनीही या तक्रारींना सकारात्मक प्रतिसाद देत, संबंधित विभागामार्फत मतदार यादीची सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
या प्रकरणामुळे उरण विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांची विश्वसनीयता आणि निवडणुकीची पारदर्शकता याबाबत पुन्हा एकदा चर्चेचा विषय निर्माण झाला आहे.
