सुलभ शौचालय झाडाझुडपामध्ये गडप — ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
श्रीवर्धन | अनिकेत मोहित
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उभारलेली सुलभ शौचालये ही ग्रामीण भागातील स्वच्छतेसाठी महत्त्वाची योजना मानली जाते. मात्र, श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर गावात ही योजना अक्षरशः झुडपामध्ये गडप झाल्याचे चित्र समोर आले आहे. ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे नव्याने बांधलेली सुलभ शौचालये सध्या दाट झाडाझुडपांनी वेढली गेली असून, वापरण्यास पूर्णतः अयोग्य ठरली आहेत.
ग्रामस्थांच्या मते, शौचालय परिसरात इतकी झाडी वाढली आहे की प्रवेशद्वारापर्यंत पोहोचणेही अशक्य झाले आहे. झुडपांमध्ये साप, विंचू आणि इतर विषारी प्राण्यांचे वास्तव्य होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. “स्वच्छ भारत मिशनचा हेतू गावात स्वच्छता आणि आरोग्य राखणे हा असताना, येथे तर अस्वच्छता आणि भयाचे साम्राज्य निर्माण झाले आहे,” अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.
नागरिकांनी या संदर्भात ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी साफसफाई, देखभाल वा दुरुस्तीची कोणतीही कार्यवाही अद्याप झालेली नाही. शौचालयांची देखरेख आणि स्वच्छता राखण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांकडून आणि ग्रामपंचायतीकडून स्पष्ट दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
“नवीन शौचालये उभारूनही ती वापरण्यायोग्य का नाहीत?” असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. या पार्श्वभूमीवर, हरिहरेश्वर ग्रामपंचायतीने तातडीने कारवाई करून झाडीझुडपे हटवून शौचालये वापरण्यायोग्य करणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
या घटनेमुळे स्वच्छ भारत मिशनच्या अंमलबजावणीवर आणि ग्रामपंचायतीच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
