महाड | मिलिंद माने
महाड पत्रकार संघाने सामाजिक बांधिलकी जपत यावर्षीही जनहिताचा उपक्रम राबविला. संघाच्या वतीने महाड तालुक्यातील बिरवाडी विभागातील शिवथर घळई येथील आदिवासी वाडीत घरगुती साहित्य वाटपाचा उपक्रम बुधवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय सावंत यांनी भूषवले. यावेळी शिवथर घळईचे उपसरपंच किशोर भोसले, शिवसेना उपतालुकाप्रमुख समीर पवार, तसेच स्थानिक आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा निर्णय संघाने घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमाचे नियोजन काटेकोरपणे करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान आदिवासी कुटुंबांना घरगुती आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे आदिवासी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय सावंत, उपाध्यक्ष महेश शिंदे, सचिव रोहित पाटील, खजिनदार मिलिंद माने, सल्लागार तुकाराम साळुंखे, उपखजिनदार सुधीर सोनार, प्रसिद्धी प्रमुख नितेश लोखंडे, कार्याध्यक्ष निलेश लोखंडे आणि सदस्य किशोर किरवे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमाबद्दल बोलताना अध्यक्ष उदय सावंत यांनी सांगितले, “पत्रकार समाजाचे आरसे आहेत; पण समाजसेवेशी जोडले गेल्यास या आरशात माणुसकीचा चेहरा अधिक स्पष्ट दिसतो.”
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित आदिवासी बांधवांनी महाड पत्रकार संघाचे आभार मानले आणि अशा उपक्रमांनी ग्रामीण वाड्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होत असल्याचे मत व्यक्त केले.
या उपक्रमामुळे महाड पत्रकार संघाने पुन्हा एकदा ‘पत्रकारिता ही केवळ बातमीपुरती नव्हे, तर समाजसेवेची जबाबदारीही आहे’ हे सिद्ध करून दाखवले.
