१३९ रुग्णांची तपासणी, २८ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया मुंबईत पार पडणार
पेण | विनायक पाटील
बाफना फाउंडेशन आणि शांतिलाल संघवी आय इन्स्टिट्यूट, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व संपूर्ण नेत्ररोग निदान शिबिराला पेणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा उपक्रम सामाजिक बांधिलकी आणि आरोग्य जनजागृतीचा आदर्श ठरला आहे.
शिबिराचे आयोजन पेण येथील जैन समाज हॉलमध्ये करण्यात आले होते. या शिबिरात एकूण १३९ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४९ रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले, तर २८ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शांतिलाल संघवी आय इन्स्टिट्यूट, वडाळा (मुंबई) येथे नेण्यात आले.
शिबिरादरम्यान रुग्णांची कॉम्प्युटराइज्ड दृष्टी चाचणी, नेत्रदबाव चाचणी, शुगर व बी.पी. तपासणी, मोतीबिंदू निदान, डायबेटीस रेटिनोपॅथी चाचणी तसेच चष्म्याच्या नंबरची तपासणी करण्यात आली.
या उपक्रमासाठी रुग्णांना मोफत प्रवास, राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली होती. “आर्थिक अडचणीमुळे नेत्रशस्त्रक्रिया न करू शकणाऱ्या रुग्णांना या शिबिरातून नवजीवन मिळणार आहे,” असे बाफना फाउंडेशनचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांनी सांगितले.
शांतिलाल संघवी आय इन्स्टिट्यूटच्या तज्ज्ञ डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी रुग्ण तपासणीसाठी अथक मेहनत घेतली. या शिबिरात जितेंद्र जाधव, अमेय म्हात्रे तसेच इन्स्टिट्यूटच्या वैद्यकीय पथकाने कार्य केले. शिबिराचे नियोजन आणि समन्वय लीना बाफना, विशाल बाफना, नितीन पाटील आणि पत्रकार विजय मोकल यांनी केले.
बाफना फाउंडेशनच्या वतीने पुढील काळातही पेण तालुक्यात विविध ठिकाणी अशा नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून, नागरिकांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या उपक्रमामुळे बाफना फाउंडेशनने पुन्हा एकदा समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचा मानवी संदेश दिला आहे.
