महाड | मिलिंद माने
महाड औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. १७ वर्षीय मुलीवर दोन नराधमांनी वेगवेगळ्या वेळी लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील चाढवे (ता. महाड) येथे ही घटना घडली. पीडित मुलगी घरी एकटी असताना आरोपी अंडा जाधव (पूर्ण नाव मिळालेले नाही) हा तिच्या घरात शिरला. त्याने पीडितेला धमकावत म्हटले की, “तू माझ्याशी शारीरिक संबंध ठेव, नाहीतर तुझ्या वडिलांना विष देऊन ठार मारीन.” भीती दाखवून त्याने त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला.
यानंतर काही दिवसांनी दुसरा आरोपी कैलास पवार (रा. चाढवे) याने देखील याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. त्याने पीडितेला तिच्या बहिणीला ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी महाड औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४२/२०२५ नोंदवण्यात आला आहे. आरोपींवर भारतीय दंड संहिता १८६० अंतर्गत कलम ३७६(१), ३७६(२)(n), ३७६(३), ४५२ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) २०१२ अंतर्गत कलम ४ आणि ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास महाड औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक व्ही. बी. फडतरे करत आहेत. पोलिसांनी आरोपी अंडा जाधव आणि कैलास पवार या दोघांना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या वारंवार घटना घडत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा मिळावी, तसेच पोलिसांनी अशा घटनांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
