• Mon. Dec 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अलिबाग समुद्रात दोघे बुडाले; ड्रोनच्या सहाय्याने शोध मोहीम सुरू

ByEditor

Nov 1, 2025

अलिबाग | प्रतिनिधी

अलिबागच्या समुद्रकिनारी आज संध्याकाळी घडलेल्या एका दुखद घटनेत दोन तरुण समुद्रात बुडून बेपत्ता झाले आहेत. सध्या पोलिस आणि जीवरक्षक दल ड्रोन तसेच बॅटरीच्या सहाय्याने या दोघांचा शोध घेत आहेत.

बुडून बेपत्ता झालेल्या तरुणांची नावे शशांक सिंग (१९, रा. उलवे, ता. उरण) आणि पलाश पखर (१९, रा. सानपाडा, नवी मुंबई) अशी आहेत. हे दोघे आणि त्यांचे दोन मित्र उरण-नवी मुंबई परिसरातून आज अलिबागला फिरायला आले होते, अशी माहिती अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांनी दिली.

संध्याकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास हे चार मित्र समुद्रकिनारी पोहण्यासाठी उतरले. त्यातील एकजण अचानक बुडू लागल्याने दुसऱ्या मित्राने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघेही लाटांमध्ये अडकून बुडून बेपत्ता झाले.
या घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलिस निरीक्षक किशोर साळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ जीवरक्षक पथकांना पाचारण करून शोधमोहीम सुरू केली.

रात्रीचा अंधार पडत असल्याने शोधकार्य अधिक कठीण झाले आहे. तरीदेखील ड्रोन आणि बॅटरी लाइटच्या मदतीने पोलिस, जीवरक्षक आणि स्थानिकांनी शोधमोहीम चालवली आहे. समुद्राच्या भरतीमुळे आणि जोरदार लाटांमुळे या शोध मोहिमेत अडथळे येत आहेत.

या दुर्घटनेमुळे अलिबाग परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यावर पोहताना खबरदारी घेण्याचे आणि जीवरक्षकांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!