• Tue. Feb 10th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगडात शिवसेना (शिंदे गट) ‘नंबर वन’, तरीही सत्तेचे गणित भाजप-राष्ट्रवादीच्या हाती!

ByEditor

Feb 9, 2026

शेकाप भुईसपाट; ५९ पैकी २१ जागा जिंकूनही शिंदे गट सत्तेबाहेर राहण्याची शक्यता

View Post(opens in a new tab)

महाड । मिलिंद माने
रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तिसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना २१ जागांसह जिल्ह्यातील ‘नंबर वन’चा पक्ष ठरली आहे. मात्र, आकड्यांचे गणित पाहता शिवसेना शिंदे गटाला सत्तेपासून दूर ठेवून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मिळून सत्ता स्थापन करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पक्षनिहाय बलाबल: शेकापचा सुपडा साफ

जिल्हा परिषदेच्या एकूण ५९ जागांपैकी निकाल खालीलप्रमाणे आहेत:

शिवसेना (शिंदे गट): २१ जागा

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): १६ जागा

भारतीय जनता पार्टी: १५ जागा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे): ०५ जागा

राष्ट्रीय काँग्रेस: ०२ जागा

शेकाप: ००

एकेकाळी रायगड जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता गाजवणारा शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) या निवडणुकीत पूर्णपणे भुईसपाट झाला असून, त्यांना एकही जागा मिळवता आली नाही.

सत्तेचे नवे समीकरण: भाजप-राष्ट्रवादी एकत्र?

जिल्ह्यात सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेना शिंदे गटाला विरोधी बाकावर बसावे लागण्याची चिन्हे आहेत. भाजप (१५) आणि राष्ट्रवादी (१६) या दोन्ही पक्षांच्या जागांची बेरीज ३१ होत असल्याने, बहुमतासाठी आवश्यक असलेला ३० चा आकडा हे दोन पक्ष सहज पार करत आहेत. त्यामुळे ‘महायुती’मध्ये असूनही स्थानिक पातळीवर शिंदे गटाला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

तालुकानिहाय निकालाचा आढावा:

१) पनवेल तालुका : ८ जागांवर भाजपाचा विजय
२) कर्जत तालुका : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ४, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष १ जागा
३) खालापूर तालुका : भाजपा १, राष्ट्रवादी काँग्रेस १, शिवसेना शिंदे गट १, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष १
४) सुधागड तालुका : भाजपा १, शिवसेना शिंदे गट १
५) पेण तालुका : भाजपा ४, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष १
६) उरण तालुका : भाजपा १, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष २, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष १
७) अलिबाग तालुका : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १, शिवसेना शिंदे गट ६
८) मुरुड तालुका : शिवसेना शिंदे गट २
९) रोहा तालुका : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष :२, शिवसेना शिंदे गट २
१०) तळा तालुका : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २
११) माणगाव तालुका : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २, शिवसेना शिंदे गट २
१२) म्हसळा तालुका : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २
१३) श्रीवर्धन तालुका : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २
१४) महाड तालुका : शिवसेना शिंदे गट ५
१५) पोलादपूर तालुका : शिवसेना शिंदे गट २

जगताप कुटुंबाला फटका

स्नेहल जगताप यांनी ‘ठाकरे गट’ सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला खरा, मात्र महाड आणि पोलादपूरमध्ये त्याचा फायदा झाला नाही. उलट, निष्ठावान शिवसैनिक ‘मशाल’ चिन्हावर ठाम राहिल्याचे चित्र दिसले.

जिल्ह्यात शिवसेनेने (शिंदे गट) मंत्री भरत गोगावले आणि महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली विक्रमी यश मिळवले असले, तरी सत्तेच्या चाव्या भाजप आणि राष्ट्रवादीने आपल्याकडे ठेवल्या आहेत. जर भाजप आणि राष्ट्रवादीने हातमिळवणी केली, तर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या पक्षाला विरोधी पक्षात बसावे लागेल, हा या निवडणुकीतील सर्वात मोठा पेच ठरणार आहे.

आगामी काळात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवेळी हे राजकारण कोणत्या दिशेला वळते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!