जिल्हा परिषदेच्या ४ जागांवर शिवसेना-राष्ट्रवादीत ‘टाय’; चुरशीच्या लढतीत दिग्गजांना धूळ
माणगाव । सलीम शेख
संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या माणगाव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेने (शिंदे गट) आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. पंचायत समितीच्या ८ पैकी ५ जागा जिंकून शिवसेनेने पुन्हा एकदा या सत्तेवर आपला भगवा फडकवला आहे. जिल्हा परिषदेच्या ४ जागांपैकी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी प्रत्येकी २-२ जागा जिंकत आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. या निकालांमुळे माणगावच्या राजकारणात ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळाली.
मंत्री विरुद्ध खासदार: प्रतिष्ठेची लढाई
माणगावची ही निवडणूक मंत्री भरत गोगावले आणि खासदार सुनील तटकरे व मंत्री आदिती तटकरे यांच्यासाठी कमालीची प्रतिष्ठेची बनली होती. शिवसेनेने ५ पंचायत समिती गणांवर आणि २ जिल्हा परिषद गटांवर विजय मिळवत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला जोरदार आव्हान दिले आहे.

जिल्हा परिषद: ‘बड्या’ नेत्यांचा पराभव
निजामपूर गट: शिवसेनेचे अविनाश नलावडे यांनी जिल्हा परिषदेचे माजी सभापती व अनुभवी नेते ॲड. राजीव साबळे यांचा पराभव करत सर्वांचे लक्ष वेधले.
गोरेगाव गट: शिवसेनेच्या दिनेश हरवंडकर यांनी राष्ट्रवादीच्या भारत गोरेगावकर यांचा पराभव करून शिवसेनेचा गड राखला.
तळाशेत गट: राष्ट्रवादीच्या दिशा दीपक जाधव यांनी शिवसेनेच्या माजी जिल्हा परिषद सदस्या स्वाती नवगणे यांचा दारुण पराभव केला.
मोर्बा गट: राष्ट्रवादीचे माजी सभापती अस्लम राऊत यांनी चुरशीच्या लढतीत शिवसेनेच्या रमेश मोरे यांना पराभूत करून आपला बालेकिल्ला शाबूत ठेवला.
पंचायत समिती: ५ जागांसह शिवसेना पुन्हा सत्तेत
पंचायत समितीवर सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेने आवश्यक आकडा गाठला आहे.
शिवसेनेचे विजयी उमेदवार: विलास शिंदे (पाटणूस), अक्षय जाधव (निजामपूर), ज्ञानदेव पदरत (वडवली), स्वाती करकरे (गोरेगाव) आणि रवींद्र टेंबे (लोणेरे).
राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार: मनीषा मालोरे (तळाशेत), संगीता संजय बक्कम (साई) आणि अलका सुभाष केकाणे (मोर्बा).
विजयाचा जल्लोष आणि कडेकोट बंदोबस्त
सोमवारी, ९ फेब्रुवारी रोजी माणगाव तहसील कार्यालयात प्रांताधिकारी डॉ. संदीपान सानप यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली. निकाल जाहीर होताच शिवसैनिकांनी तहसील मैदानावर गुलालाची उधळण करत “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही आपल्या विजयी उमेदवारांचे जल्लोषात स्वागत केले. उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे आणि पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
या निकालाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांना मोठी ऊर्जा दिली असून, शिवसेनेने सत्तेवर कब्जा मिळवत मंत्री भरत गोगावलेंचा शब्द खरा ठरवला आहे.
