मंत्री भरत गोगावलेंचे वर्चस्व अबाधित; तटकरे-भाजप युतीची दाणादाण, राष्ट्रवादी बॅकफूटवर
महाड । मिलिंद माने
रायगड जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्र असलेल्या महाडमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही आमदार तथा मंत्री भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) पक्षाने विरोधकांना धूळ चारली आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व ५ जागांवर आणि पंचायत समितीच्या १० पैकी ९ जागांवर दणदणीत विजय मिळवत शिवसेनेने महाडवर आपले एकतर्फी वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजप युतीला मोठा धक्का बसला असून, राष्ट्रवादीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

जिल्हा परिषदेत शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व
महाडमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात झालेल्या मतमोजणीत सुरुवातीपासूनच शिवसेनेच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती.
नडगाव तर्फे बिरवाडी विभाग: या प्रतिष्ठेच्या लढतीत मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास भरत गोगावले यांनी ५,००० हून अधिक मतांची आघाडी घेत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष निलेश महाडिक यांचा दारुण पराभव केला.
करंजाडी विभाग: जनसंपर्क दांडगा असलेल्या निलेश लक्ष्मण ताठरे यांनी सोमनाथ ओझर्डे आणि चेतन औकीरकर यांसारख्या प्रतिस्पर्ध्यांना पराभवाचा धक्का दिला.
बिरवाडी गटातून मंदा भागोजी ढेबे, खरवली गटातून मनाली मनोज काळीजकर आणि दासगाव गटातून मन्सूर अ. हमीद ताज यांनी भगवा फडकवला.

पंचायत समिती: ९ जागांसह शिवसेनेची सत्ता
पंचायत समितीमध्येही शिवसेनेने आपला विजयरथ कायम राखला. विजयी उमेदवारांमध्ये नूतन गोपाळ मोरे (वरंध), दिव्या मनोहर रेशीम (खरवली), रेणुका राजेश देशमुख (नडगाव), सुरेश शांताराम महाडिक (नाते), प्रेरणा जितेंद्र सावंत (दासगाव), संदीप रमेश खिडबडे (करंजाडी), शकुंतला श्रीरंग माने (विन्हेरे) आणि सबिया पाचकर (अप्पर तुडील) यांचा समावेश आहे. सवाने गणातून अनिल जाधव हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. राष्ट्रवादी-भाजप युतीकडून केवळ मयूर पुंडलिक जाधव (बिरवाडी गण) यांनी विजय मिळवत आपले खाते उघडले.
निवडणूक जिल्हा परिषदेची, गुलाल विधानसभेचा!
नगरपालिका निवडणुकीनंतर ही निवडणूक मंत्री भरत गोगावले यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. विशेषतः विकास गोगावले यांच्या विजयानंतर महाडमध्ये जणू विधानसभा निवडणुकीचाच निकाल लागला आहे, अशा जल्लोषात गुलालाची उधळण करण्यात आली. खा. सुनील तटकरे आणि भाजपची युती होऊनही गोगावलेंच्या अभेद्य गडाला त्यांना तडा देता आला नाही.
राष्ट्रवादी बॅकफूटवर; ‘मशाल’ शांतच
स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जगताप कुटुंबाची ताकद वाढेल अशी अपेक्षा होती, मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादीची कामगिरी खालावल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मते स्थिर असली, तरी त्यांना विजयापर्यंत पोहोचता आले नाही. राष्ट्रवादीसोबत जाण्याचा जगताप समर्थकांचा निर्णय मतदारांना फारसा रुचला नसल्याचे या निकालावरून स्पष्ट होत आहे.
“हा विजय महाडच्या जनतेने विकासकामांवर टाकलेला विश्वास आहे. विरोधकांच्या युतीला मतदारांनी नाकारून शिवसेनेच्या कामाची पावती दिली आहे,” अशी प्रतिक्रिया विजयी उमेदवारांनी व्यक्त केली.
