आमदार आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांच्या रणनीतीपुढे विरोधक चितपट; घड्याळाची टिक-टिक कायम
श्रीवर्धन । अनिकेत मोहित
श्रीवर्धन तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ चा निकाल जाहीर झाला असून, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (घड्याळ) आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. खासदार सुनील तटकरे आणि आमदार आदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखालील ‘घड्याळाचा गजर’ तालुक्यात जोरदार घुमला असून मतदारांनी राष्ट्रवादीच्या झोळीत भरभरून मते टाकली आहेत.
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची मोठी मुसंडी
जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (घड्याळ) वासंती मंगेश गुणाजी यांनी विजयाचा गुलाल उधळला. त्यांनी १२,०९२ मते मिळवून शेकापच्या शारदा देवजी नाईक (४,०५७ मते) यांचा प्रचंड मताधिक्याने पराभव केला. आराठी निवडणूक विभागातूनही राष्ट्रवादीच्या वैभवी मंगेश कोमनाक यांनी ८,३८४ मते मिळवत शिवसेनेच्या अक्षदा कोलंबेकर यांच्यावर मात केली आणि आपली जागा राखली.
पंचायत समिती: चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादीचे पारडे जड
पंचायत समितीच्या गणांमध्ये राष्ट्रवादीने (अजित पवार गट) आपले वर्चस्व कायम राखले आहे:
दिघी गण: राष्ट्रवादीचे सचिन नंदाकर कीर ४,२१० मते मिळवून विजयी झाले. त्यांनी शिवसेना आणि मनसेच्या उमेदवारांना मोठ्या फरकाने मागे टाकले.
बागमांडला गण: राष्ट्रवादीच्या अस्मिता प्रदर्शन चोरगे (४,०४१ मते) यांनी शिवसेनेच्या वर्षा जोशी यांचा पराभव करत विजयाची मोहर उमटवली.
बोर्ली पंचतनमध्ये निसटता निकाल: या गणात अत्यंत अटीतटीची लढत झाली. शिवसेना (शिंदे गट) चे सुकुमार तोंडलेकर यांनी ३,९८५ मते मिळवत राष्ट्रवादीच्या रमेश घरत (३,९५० मते) यांचा अवघ्या ३५ मतांनी पराभव केला.
आराठी गण: येथे भारतीय जनता पार्टीने खाते उघडले असून पूजा प्रशांत नाईक (४,१०९ मते) यांनी विजय संपादन केला.
विकासाच्या मुद्द्यावर मतदारांची मोहोर
या निकालांमुळे श्रीवर्धन तालुक्यात अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची पकड अधिक मजबूत झाली आहे. मतदारांनी विकासाच्या मुद्द्यावर आणि तटकरे पिता-पुत्रींच्या कामावर विश्वास दाखवल्याचे चित्र आहे. या विजयामुळे आगामी स्थानिक राजकारणात राष्ट्रवादीचे स्थान अधिक भक्कम झाले असून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.
निकालांनंतर राष्ट्रवादी आणि भाजपच्या विजयी उमेदवारांची गुलालाची उधळण करत आणि ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. “हा विजय विकासाचा आणि जनतेच्या विश्वासाचा आहे,” अशी भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
