अलिबाग: रायगड जिल्ह्याचे राजकारण अनेक दशके आपल्या हाती राखणाऱ्या भारतीय शेतकरी कामगार पक्षाला (शेकाप) त्यांच्याच बालेकिल्ल्यात, म्हणजेच अलिबाग तालुक्यात, २०२६ च्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व गाजवत शेकापच्या लाल किल्ल्याला मोठे खिंडार पाडले आहे. वर्षानुवर्षे ‘लाल बावट्या’चा गड राहिलेल्या या तालुक्यात शिवसेनेने अभूतपूर्व यश मिळवत शेकापच्या वर्चस्वाला सुरुंग लावला आहे. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर झालेल्या या निकालांनी जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांत मोठी उलथापालथ घडवून आणली आहे.
आमदार महेंद्र दळवींच्या रणनीतीला मोठे यश या निवडणुकीत आमदार महेंद्र दळवी यांनी अत्यंत नियोजनबद्ध रणनीती आखली होती. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच शिवसेनेने जिल्हा परिषदेच्या अनेक महत्त्वाच्या जागांवर विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, थळ विभागातून त्यांच्या पत्नी मानसी महेंद्र दळवी यांनी १४,३२८ मते मिळवून शेकापच्या उमेदवाराचा ६,००० हून अधिक मतांच्या फरकाने पराभव केला आहे. या विजयामुळे तालुक्यात आमदार दळवींचे वर्चस्व अधिकच अधोरेखित झाले आहे.
निकालातील ठळक बाबी:
आंबेपूर विभाग: शिवसेनेच्या रसिका राजा केणी यांनी ११,९७४ मते मिळवून मोठा विजय संपादन केला. येथे भाजपच्या चित्रा आस्वाद पाटील यांना ७४५९ मते मिळाली तर शेकापच्या पूजा अजित भगत यांना केवळ ४,७८५ मतांवर समाधान मानावे लागले.
आवास विभाग: शिवसेनेच्या दिलीप विठ्ठल भोईर (छोटमशेठ) यांनी ११,९३३ मते मिळवून काँग्रेसच्या राजेंद्र ठाकूर यांचा २,३७२ मतांनी पराभव केला.
थळ विभाग: शिवसेनेच्या मानसी महेंद्र दळवी यांनी १४,३२८ मते मिळवून निर्विवाद वर्चस्व गाजवले, तर शेकापच्या सानिका सुरेश घरत ७,८५९ मतांसह पिछाडीवर राहिल्या.
चेंढरे विभाग: शेकापच्या प्रवीणा प्रमोद घासे (६,२५८ मते) यांचा पराभव करून शिवसेनेच्या अदिती नाईक दळवी (११,३१३ मते) विजयी झाल्या आहेत.
कावीर विभाग: शिवसेनेच्या अनंत नारायण गोंधळी यांनी ९,६९९ मते घेत शेकापच्या मोहन दत्तात्रेय धुमाळ (९,५४५ मते) यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव केला.
पंचायत समितीमध्येही शेकापची पिछेहाट
जिल्हा परिषदेप्रमाणेच पंचायत समितीच्या गणांमध्येही शिवसेनेने आपले वर्चस्व राखले आहे:
रुईशेत भोमोली: शिवसेनेच्या कृष्णा जानू लोभी यांनी ७,०५२ मते मिळवून शेकापच्या रूपेश उघडा (२,७३५ मते) यांचा मोठा पराभव केला.
आंबेपूर गण: शिवसेनेचे शैलेंद्र राम पाटील ४,७२९ मते घेऊन विजयी झाले, तर शेकापचे धनंजय म्हात्रे ३,७२१ मतांवर थांबले.
शहापूर गण: शिवसेनेच्या भाग्यता नंदन पाटील ३,८२० मते घेऊन विजयी झाल्या.
वैजाळी गण: शिवसेनेच्या प्रकाश चंद्रसेन पाटील यांनी ३,३७६ मते मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मच्छिंद्र पाटील (३,३५१ मते) यांचा अवघ्या २५ मतांनी पराभव केला.
अलिबाग तालुका हा शेकापचा ‘बालेकिल्ला’ म्हणून ओळखला जात असे, मात्र या निकालांनी त्या प्रतिमेला तडा दिला आहे. अनेक ठिकाणी शेकापचे दिग्गज उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. आमदार महेंद्र दळवी यांनी शिवसेनेच्या माध्यमातून तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचून शेकापच्या परंपरागत मतपेढीला सुरुंग लावल्याचे या निकालांवरून दिसून येत आहे.
हा निकाल आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, अलिबागमध्ये आता शिवसेनेची ताकद कैक पटीने वाढली आहे. आमदार महेंद्र दळवी यांच्या या यशाचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
