हाती काठी अन् मनात देशप्रेम; १०३ वर्षीय नामुबाईंच्या उत्साहाने उरणकर भारावले
उरण । घन:श्याम कडू
लोकशाही ही केवळ घोषणा नसून ती एक जिवंत प्रक्रिया आहे, हे उरण तालुक्यातील नवघर जे.एन.पी.टी. वसाहतीत राहणाऱ्या १०३ वर्षीय नामुबाई रामा घरत यांनी पुन्हा एकदा आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. वयाची शंभरी ओलांडली असली, तरी मतदानाचा हक्क बजावण्याची त्यांची जिद्द आजच्या तरुणाईला प्रेरणा देणारी आणि अनेकांना लाजवणारी ठरली आहे.
विधानसभा मतदारसंघ क्रमांक १९० – उरण, भाग क्रमांक १८८ – नवघर जे.एन.पी.टी. कॉलनी येथील अधिकृत मतदार यादीत नामुबाईंचे नाव आजही ठामपणे नोंदवलेले आहे. १९२३ साली जन्मलेल्या या माऊलीने गेल्या अनेक दशकांपासून लोकशाहीचा प्रत्येक उत्सव जवळून पाहिला आहे आणि आजही त्यांचा या प्रक्रियेवरचा विश्वास तसूभरही ढळलेला नाही.
आजच्या काळात सुशिक्षित वर्ग आणि तरुण पिढी अनेकदा मतदानाकडे पाठ फिरवताना दिसते. अशा वेळी नामुबाई घरत यांसारख्या ज्येष्ठ मतदारांचे अस्तित्व प्रशासन, राजकीय पक्ष आणि लोकशाहीप्रेमींसाठी एक आदर्श आरसा ठरत आहे. “मतदान म्हणजे केवळ हक्क नसून ती एक मोठी जबाबदारी आहे,” हा मोलाचा संदेश नामुबाईंच्या आयुष्यातून मिळतो.
उरण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक नोंदणी दप्तरी त्यांची ‘EPIC’ नोंद स्पष्ट असून, नवघर परिसरातील नागरिकांसाठी त्या केवळ एक मतदार नसून लोकशाहीची चालती-बोलती साक्ष आहेत. सध्या राजकीय क्षेत्रात आरोप-प्रत्यारोपांची राळ उडत असताना, नामुबाई घरत यांचा शांत पण ठाम सहभाग एकच गोष्ट सांगून जातो, लोकशाही टिकवायची असेल, तर आधी सजग मतदार हवा, आणि तो नामुबाईंच्या रूपाने आजही उरणमध्ये ठाम उभा आहे.
