माणगाव । सलीम शेख
रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी माणगाव तालुक्यातील ४ जिल्हा परिषद गट आणि ८ पंचायत समिती गणांमध्ये शनिवारी (७ फेब्रुवारी) अत्यंत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत झालेल्या या मतदानात मतदारांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. दुपारी ३:३० वाजेपर्यंत तालुक्यात सरासरी ५२ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. संदीपान सानप यांनी दिली.
निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे व माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या निवडणुकीत प्रामुख्याने निजामपूर, तळाशेत, मोर्बा आणि गोरेगाव या जिल्हा परिषद गटांसह पाटणूस, साई, वडवली, लोणेरे या पंचायत समिती गणांमध्ये विविध पक्षांच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली.
मैदानात असलेले प्रमुख उमेदवार:
- निजामपूर गट: अविनाश नलावडे (शिवसेना), जनार्दन मानकर (शिवसेना-उबाठा), राजीव साबळे (राष्ट्रवादी) व दत्ता काशीराम गोरेगांवकर ( अपक्ष ), संजय अर्जुन धाग ( अपक्ष ), राजू मोहन रोडेकर उर्फ सुतार
(अपक्ष) - तळाशेत गट: दिशा जाधव (राष्ट्रवादी), स्वाती नवगणे (शिवसेना), भारती सुर्वे (काँग्रेस), रिया रोडेकर उर्फ सुतार (अपक्ष).
- मोर्बा गट: आरिफ मणेर (शिवसेना-उबाठा), रमेश मोरे (शिवसेना), अस्लम राऊत (राष्ट्रवादी).
- गोरेगाव गट: नरेश अहिरे (शिवसेना-उबाठा), भारत गोरेगावकर (राष्ट्रवादी), दिनेश हरवंडकर (शिवसेना), भूषण संघरत्न जाधव (अपक्ष)
याशिवाय पंचायत समितीच्या ८ गणांमध्येही शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, मनसे आणि अपक्ष उमेदवारांनी नशीब आजमावले आहे. सर्वच ठिकाणी प्रस्थापित आणि नवख्या उमेदवारांमध्ये काट्याची लढत झाल्याने निकालाबाबत तालुक्यात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याने सर्व उमेदवारांचे भवितव्य आता मतपेटीत बंद झाले आहे. या निवडणुकीची मतमोजणी सोमवार, दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून माणगाव येथील मध्यवर्ती प्रशासकीय भवन (तहसील कार्यालय) येथील भव्य सभागृहात पार पडणार आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत सत्तेचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
