लग्नमंडपात जाण्यापूर्वी हृतिक जाधवने बजावला मतदानाचा हक्क; धाटावमध्ये सर्वत्र कौतुक
धाटाव । शशिकांत मोरे
लग्नाच्या धामधुमीत अनेक जण आपल्या सामाजिक जबाबदाऱ्या विसरतात, मात्र धाटाव येथील एका नवरदेवाने लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वी लोकशाहीप्रती आपले कर्तव्य पार पाडून समाजात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. राजेंद्र पांडुरंग जाधव यांचे चिरंजीव हृतिक जाधव यांचा विवाह वांदोली येथील चिंतामणी कडव यांची सुकन्या काश्मिरी हिच्याशी ठरला असताना, हृतिकने लग्नमंडपात जाण्यापूर्वी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.

लग्नासाठी सज्ज झालेला हृतिक पारंपारिक वेशभूषा आणि डोक्याला फेटा बांधून थेट मतदान केंद्रावर पोहोचला. यावेळी मतदान केंद्रावरील उपस्थित नागरिक आणि प्रशासकीय अधिकारी यांनी टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले. “आधी लगीन कोंढाण्याचे, मग माझ्या रायबाचे” या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शब्दांची आठवण आज हृतिकच्या कृतीने करून दिली. आयुष्याची नवीन सुरुवात करताना देशाच्या भक्कम भविष्यासाठी प्रत्येक बोट शाईने माखणे आवश्यक आहे, हा विचार त्याने आपल्या कृतीतून मांडला. लग्नाच्या पहिल्या फोटोपेक्षा या मतदानानंतरच्या फोटोंना वऱ्हाडी मंडळी आणि ग्रामस्थांकडून अधिक पसंती मिळत असून, हृतिकच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
या प्रसंगी नवरदेवासोबत माजी सरपंच प्रभावती जाधव, राधिका जाधव, ज्योती जाधव, नीलम जाधव, सतीश जाधव, पांडुरंग जाधव, सूर्यकांत मोरे, अनिमेश पाशिलकर, नयन रटाटे, महेंद्र रटाटे, उमेश रटाटे, गणेश भोकटे, ओमकार पाशिलकर, राकेश म्हसकर, भास्कर रटाटे, राजू भोकटे यांसह मित्रपरिवार व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊन वृतिक जाधव खऱ्या अर्थाने ‘आदर्श नागरिक’ ठरला असून, त्याचे हे पाऊल भविष्यातील मतदारांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
