• Tue. Feb 10th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रोहा तालुक्यात मतदानाचा उत्साह; चारही जि. प. गटांत ५६ टक्के मतदान

ByEditor

Feb 7, 2026

महिलांचा टक्का पुरुषांपेक्षा अधिक; ‘लाडकी बहीण’ योजनेचा प्रभाव?

धाटाव । शशिकांत मोरे
रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहा तालुक्यातील चारही जिल्हा परिषद गटांमध्ये मंगळवारी शांततेत व उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळपासूनच मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, एकूण ५६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. यामध्ये महिलांचा सहभाग पुरुषांपेक्षा अधिक असल्याचे प्रकर्षाने दिसून आले, तर दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांनीही लोकशाहीच्या या महापर्वात आपला हक्क बजावला.

तालुक्यात सकाळी ७:३० वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. सकाळी ११:३० वाजेपर्यंत २७ टक्के मतदान झाले होते, तर दुपारी १:३० पर्यंत हा टक्का ४३ वर पोहोचला. दुपारी ३ वाजेपर्यंत एकूण ५५ टक्के मतदान पूर्ण झाले होते. संपूर्ण प्रक्रियेत महिला मतदारांची संख्या लक्षणीय होती. विशेषतः ‘लाडकी बहीण’ योजनेचा प्रभाव मतदान केंद्रांवरील महिलांच्या गर्दीतून जाणवत होता.

राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या नागोठणे, आंबेवाडी आणि भुवनेश्वर या तीन जिल्हा परिषद गटांत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट अटीतटीची लढत पाहायला मिळाली. तर घोसाळे गटात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शेकाप या प्रमुख पक्षांमध्ये चुरशीची लढत रंगली आहे. या गटात मुंबईकर मतदारांचा कल कोणाच्या पारड्यात गेला आहे, याबाबत आता राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

रोहा तालुक्यातील ३९-नागोठणे, ४०-आंबेवाडी, ४१-भुवनेश्वर व ४२-घोसाळे या चार जिल्हा परिषद गटांसह आठ पंचायत समिती गणांमध्ये प्रशासनाच्या काटेकोर नियोजनामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलीस बंदोबस्तात शांततेत पार पडलेल्या या मतदानानंतर आता सर्वांचे लक्ष ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!