माणगाव । सलीम शेख
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेले भाताचे प्रचंड नुकसान झाले असून गरीब शेतकरी राजा पुरता हैराण झाला आहे. तालुक्यातील या नुकसानग्रस्त भागातील भातशेतीची पाहणी तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी केली. यावेळी त्यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते भगवान पवार उपस्थित होते. या गोरगरीब शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा माणगाव तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना दिला आहे.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना ज्ञानदेव पवार पुढे म्हणाले कि,भारताच्या इतिहासात पहिल्यादांच शेतकऱ्यांनी भाताची पेरणी केल्यापासून अगदी लावणी – कापणी पर्यंत सातत्याने मुसळधार पाऊस पडत आहे. अगदी थंडीचे दिवस आले असतानाही अवकाळी मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे कोकणातील शेतकरी बेहाल झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांची शेती एकरीत आहे. तर कोकणात शेतकऱ्यांची शेती गुंठ्यात आहे. भातशेती म्हणजे गरीब शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे साधन आहे. गरीब शेतकरी काबाड कष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवीत असतो. त्यामध्ये या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर आसमानी संकट कोसळले आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला भात शेतातच आडवा झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी भात कापणी करून रचून ठेवलेल्या मळण्या भिजल्या आहेत. एकंदरीत शेतकऱ्यांचे हे भात पूर्णतः नष्ट झाले असून गरीब शेतकऱ्यांच्या डोळ्यांतून अश्रू येत आहेत. या शेतकऱ्यांना पुढे स्वतःचे बियाणे देखील मिळणार नसून ती बियाणे विकत घ्यावी लागणार आहेत.
या नुकसानग्रस्त गरीब शेतकऱ्यांना शासनाने एकरी लाख रूपये तात्काळ मदत द्यावी अन्यथा माणगाव तालूका शेतकरी संतघटनेतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी दिला आहे.
