हॉटेल व्यावसायिकांकडून वन व मेरीटाईम बोर्डाच्या हद्दीत अतिक्रमण – स्थानिकांचा आरोप
श्रीवर्धन | अनिकेत मोहित
कोंडविल समुद्रकिनाऱ्यावरील सरकारी जमिनीवर हॉटेल व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. वन विभाग आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या जमिनीवर नियमबाह्य बांधकामे, झाडांची कत्तल आणि सिमेंटचे रस्ते तयार करण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, वन विभागाच्या हद्दीत सुरू आणि केतकीच्या झाडांची तोड करून पक्के रस्ते तयार करण्यात आले आहेत. काही ठिकाणी सिमेंटच्या फरशा बसवून बांधकामेही करण्यात आली आहेत. वन कायद्यानुसार हा प्रकार गंभीर गुन्हा मानला जातो, मात्र संबंधित अधिकारी ‘मोजणी सुरू आहे’ असे कारण देत कारवाई टाळत असल्याची टीका नागरिकांनी केली आहे.
तसेच, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या हद्दीत अनधिकृतपणे आर.सी.सी. पायऱ्या बांधून थेट समुद्रात जाण्यासाठी मार्ग तयार करण्यात आले आहेत. या सर्व बांधकामांमुळे किनाऱ्याच्या नैसर्गिक रचनेला धोका निर्माण झाला असून, धूपप्रवण भागात ही कामे पर्यावरणीय दृष्टीने धोकादायक असल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे.
सर्वसामान्य नागरिकांवर किरकोळ अतिक्रमणासाठी तातडीने कारवाई केली जाते, मात्र धनदांडग्यांच्या अतिक्रमणाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी जिल्हा वनक्षेत्रपालांकडे केली असून, या संदर्भातील लेखी तक्रारी वरिष्ठ कार्यालयांकडे दाखल करण्यात आल्या आहेत.
