• Tue. Dec 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

दिवेआगर मधील ४४ कुटुंबांना मिळाली हक्काची जागा

ByEditor

Nov 3, 2025

अदिती तटकरे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना सनद वाटप

दिघी । गणेश प्रभाळे

श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिध्द दिवेआगर पर्यटन ठिकाणी सरकारी जागेवरती अतिक्रमण केलेल्या ४४ कुटुंबांना शासनाने सदर अतिक्रमण नियमानुकूल करून दिलासा दिला आहे. महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत अतिक्रमण धारक कुटुंबियांना सनद ची वाटप करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा दिनांक १७-०९-२०२५ ते ०२-१०-२०२५ साजरा करण्यात आला. सदर महाराजस्व अभियाना अंतर्गत श्रीवर्धन प्रांताधिकारी महेश पाटील, तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांनी श्रीवर्धन तालुक्यातील मौजे दिवेआगर तसेच इतर गावातील सरकारी जमिनीवरील अतिक्रमणधारक नागरिक यांच्याशी संवाद साधत अतिक्रमण केलेल्या जागा शासन नियमानुसार नियमानुकूल करण्यासंदर्भात ठोस भूमिका घेतली .

रविवारी ब्राह्मण हॉल दिवेआगर येथील सभागृहात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते दिवेआगर मधील ४४ व्यक्तींना जागेच्या सनद ची वाटप करण्यात आली. सदरच्या कार्यक्रमात जिवंत सातबारा मोहीम अंतर्गत सातबारा, शेतकरी कार्ड व प्रशासनातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र देण्यात आले.

कार्यक्रम प्रसंगी आदिती तटकरे यांनी उपस्थितांना संबोधित करत असताना सांगितले की, आगामी काळात दिवेआगार मधील पर्यटनात अमुलाग्र बदल होणार आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी जमिनी विक्री करू नये . स्थानिक पर्यटनातून रोजगारास चालना द्यावी. दिवेआगर येथील समुद्रकिनारा महाराष्ट्रातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. आज अनेक कुटुंबांना हक्काच्या घरासाठी जागा मिळाली याचा आनंद आहे. विद्यमान सरकार सर्व सामान्यांसाठी काम करत आहे असे अदिती तटकरे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत प्रांत अधिकारी महेश पाटील यांनी विविध शासकीय योजना व त्याच्या अंमलबजावणी बाबत माहिती दिली . कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नायब तहसीलदार मनोज माने यांनी केले. कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मोहम्मद मेमन, उदय बापट, नंदू पाटील, वसीम फकजी, लालाभाई जोशी, सुचिन किर, सिद्धेश कोसबे व इतर मान्यवर आणि लाभार्थी नागरिक उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!