अलिबाग । प्रतिनिधी
अलिबाग-रोहा मार्गावरील वढाव ते खानाव दरम्यानचा पूल सोमवारी (दि. ३) सायंकाळी सातच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेमुळे मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी टळली आहे. पुलावरून प्रवास करत असताना एक दुचाकीस्वार थोडक्यात बचावला असून, दुसऱ्या एका चालकाला किरकोळ दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
या घटनेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पूल दुरुस्ती आणि वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत.
