मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज (मंगळवार, 4 नोव्हेंबर) आयोजित पत्रकार परिषदेत 246 नगर परिषद आणि 42 नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली. या सर्व ठिकाणी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार असून, मतमोजणी 3 डिसेंबर 2025 रोजी पार पडेल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. या पत्रकार परिषदेला सचिव सुरेश काकाणे, उपसचिव सूर्यकृष्ण मूर्ती आणि उपायुक्त राजेंद्र पाटील उपस्थित होते.
निवडणूक कार्यक्रम:
- नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात: 10 नोव्हेंबर 2025
- अंतिम तारीख: 17 नोव्हेंबर 2025
- छाननी दिनांक: 18 नोव्हेंबर 2025
- नामनिर्देशन माघारी (अपील नसलेल्यांसाठी): 21 नोव्हेंबर 2025
- नामनिर्देशन माघारी (अपील असलेल्यांसाठी): 25 नोव्हेंबर 2025
- अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप: 26 नोव्हेंबर 2025
- मतदान: 2 डिसेंबर 2025
- मतमोजणी: 3 डिसेंबर 2025
- निकाल राजपत्रात प्रसिद्धी: 10 डिसेंबर 2025
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयोगाने ही प्रक्रिया सुरू केली आहे.
या निवडणुकांमधून 86859 सदस्य आणि 288 अध्यक्ष निवडले जाणार आहेत. 246 नगर परिषदांपैकी 10 नव्याने स्थापन झालेल्या आहेत, तर उर्वरित 236 ची मुदत संपलेली आहे. नगरपंचायतींच्या बाबतीत 42 नगरपंचायतींसाठी निवडणुका होत असून, त्यापैकी 15 नवीन आणि 27 जुन्या आहेत. उर्वरित 105 नगरपंचायतींचा कार्यकाळ अद्याप संपलेला नाही.
प्रभागनिहाय मतदान व्यवस्था
नगर परिषदेत सदस्यसंख्या 20 ते 75 दरम्यान असून निवडणूक बहुसदस्य पद्धतीने घेतली जाईल. साधारण एका प्रभागात दोन जागा असतील; तर विषम संख्या असल्यास तीन जागा राहतील. मतदारांना सदस्य आणि अध्यक्ष या दोन्ही पदांसाठी मतदान करता येईल. नगर पंचायतीत मात्र एक सदस्य आणि एक अध्यक्ष अशी एकाच सदस्यावर आधारित रचना आहे.
ऑनलाइन प्रक्रिया आणि सुविधा
- नामनिर्देशनपत्रे राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून दाखल करता येतील.
- एका प्रभागात उमेदवारास जास्तीत जास्त चार नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची परवानगी.
- जात वैधता प्रमाणपत्र किंवा अर्जाची पावती सादर करणे बंधनकारक. निवडून आल्यास सहा महिन्यांत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.
- मतदार याद्या 7 नोव्हेंबर 2025 रोजी मतदान केंद्रनिहाय जाहीर होतील.
- मतदारांसाठी मोबाइल अॅप आणि संकेतस्थळ विकसित करण्यात आले असून, त्यावरून मतदार केंद्र, उमेदवारांची माहिती आणि इतर तपशील शोधता येतील.
| वर्ग | अध्यक्ष पदासाठी मर्यादा | सदस्य पदासाठी मर्यादा |
|---|---|---|
| अ वर्ग नगर परिषद | ₹15 लाख | ₹5 लाख |
| ब वर्ग नगर परिषद | ₹11.25 लाख | ₹3.5 लाख |
| क वर्ग नगर परिषद | ₹7.5 लाख | ₹2.5 लाख |
| नगर पंचायत | ₹6 लाख | ₹2.25 लाख |
या घोषणेमुळे राज्याच्या राजकारणात नवचैतन्य संचारले आहे. स्थानिक पातळीवरील पक्षांची चाचणी ठरणाऱ्या या निवडणुकांमुळे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांपूर्वी जनतेचा कल जाणून घेण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे.
