कोलाड । विश्वास निकम
रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यात परतीच्या पावसाचा जोर कायम असून सातवा महिना उलटूनही पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. यामुळे उभी भात पिके आडवी झाली असून सततच्या पावसामुळे या पिकांना मोड येऊन ती कुजण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी, बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची वेळ आली असून शेतकरी पूर्णपणे संकटात सापडले आहेत.
भिजलेल्या भातामुळे पेंढाही निकामी ठरत असल्याने गुरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत बळीराजाच्या डोळ्यात हताशेचे पाणी आले असून शासनाकडे नुकसानभरपाईच्या मागण्या होत आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या १० नोव्हेंबरपर्यंत पाऊस सुरू राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून हा अंदाज खरा ठरत असल्याचे दिसून येत असून, त्यामुळे भात कापणीला मोठा विलंब होत आहे. सततच्या पावसामुळे ८० टक्के भात कापणी अद्याप बाकी असून शेतात पाणी साचल्याने भात पिके कुजली आहेत.
या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून तत्काळ पंचनामे करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
दरम्यान, यापूर्वीही मे महिन्यात रब्बी हंगामात पुगांव, मुठवली, शिरवली, खांब आदी भागांमध्ये पडलेल्या अवकाळी पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान केले होते. त्यावेळी पंचनामे झाले असले तरी नुकसानभरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही.
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या तुफान पावसामुळेही अनेक तालुक्यांतील भात पिके जमीनदोस्त झाली होती. त्याचे पंचनामेही करण्यात आले, मात्र भरपाईची प्रतीक्षा अद्याप सुरू आहे.
आधुनिक शेतीत वाढत्या खतांच्या आणि मशागतीच्या खर्चामुळे शेतकऱ्यांवर आधीच आर्थिक ओझे आहे. त्यात निसर्गाच्या कोपामुळे सोन्यासारखी भात पिके मातीमोल झाली आहेत. त्यामुळे शासनाने संपूर्ण जिल्ह्यातील भातशेतीचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी तीव्र होत आहे.
