• Thu. Jan 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

गव्हाण फाट्यावरील रेल्वे क्रॉसिंग पुलाचे काम दोन वर्षांपासून रखडले; रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष!

ByEditor

Nov 5, 2025

उरण । अनंत नारंगीकर
नवी मुंबई शहराला आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणाऱ्या गव्हाण फाट्याजवळील रेल्वे क्रॉसिंग पुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले असून, या संथगतीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या पुलाच्या अपूर्ण कामामुळे वाहतुकीचा ताण वाढला असून, रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षित भूमिकेमुळे प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तत्काळ या पुलाच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवासी वर्गातून जोर धरत आहे.

गव्हाण फाट्यावरील हा रस्ता नवी मुंबई, पनवेल आणि चिरनेर पूर्व विभागातील विद्यार्थी, चाकरमानी व नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. परंतु, रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणामुळे ऑक्टोबर २०२३ मध्ये जुन्या पुलाचे काम तोडण्यात आले आणि त्याऐवजी टाटा प्रोजेक्ट्स लि. या कंपनीकडे नवीन पुलाचे बांधकाम सोपविण्यात आले. मात्र, गेल्या दोन वर्षांत हे काम अत्यंत संथगतीने सुरू असून, पुलाचे काम अपूर्णच राहिले आहे.

यामुळे नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. अवजड वाहनांचा ताण वाढल्याने वळसा घालून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक वेळा प्रवाशांनी या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले, मात्र अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.

दरम्यान, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर या परिसरातील वाहतुकीचा ओघ आणखी वाढणार आहे. त्यामुळे गव्हाण फाट्यावरील पुलाचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण होणे अत्यावश्यक आहे. रेल्वे प्रशासन आणि संबंधित विभागांनी या कामाला गती देऊन नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी प्रवासी व स्थानिक नागरिकांकडून सातत्याने होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!