श्रीवर्धन । अनिकेत मोहित
रायगड जिल्ह्याच्या पोलिस दलाला अभिमान वाटावा अशी कामगिरी श्रीवर्धन उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) सविता गर्जे यांनी करून दाखवली आहे. गुजरातमधील केवडिया येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘एकता परेड’ मध्ये त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलाच्या पथकाचे नेतृत्व केले.
या राष्ट्रीय स्तरावरील भव्य परेडला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. देशभरातील विविध राज्यांतील पोलीस दलांनी सहभाग घेतला होता. या परेडचे आयोजन भारताचे पहिले गृहमंत्री आणि “लोहपुरुष” म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी करण्यात आले होते.
DYSP सविता गर्जे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र पोलीस दलाने उत्कृष्ट शिस्त, एकसंधता आणि देशभक्तीचा अद्भुत संगम सादर केला. त्यांच्या या नेतृत्वामुळे रायगड जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, तरुण पोलीस अधिकाऱ्यांसाठी त्या प्रेरणास्थान ठरल्या आहेत.
संपूर्ण रायगड जिल्ह्यात तसेच श्रीवर्धन परिसरात सविता गर्जे यांच्या या कामगिरीबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिष्ठा राष्ट्रीय पातळीवर अधिक उजळली आहे.
