तटकरे ठरणार ‘किंगमेकर’? उमेदवारी अर्ज प्रक्रियेला १० नोव्हेंबरपासून प्रारंभ
सत्ताधारी पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे स्वबळावर लढण्याची शक्यता वाढली
महाड । मिलिंद माने
रायगड जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून सोमवार, १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. सत्ताधारी महायुतीतील गटबाजी आणि अंतर्गत नाराजी पाहता, स्वबळावर लढण्याची तयारी अनेक पक्षांकडून सुरू आहे. विशेषतः महाड नगरपरिषदेची निवडणूक ‘ऐतिहासिक’ ठरण्याची चिन्हे दिसत आहेत, कारण पारंपरिक जगताप विरुद्ध गोगावले हीच लढत पुन्हा रंगणार असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. मात्र, पडद्यामागचे सूत्र तटकरे यांच्याकडेच असल्याचे बोलले जात आहे.
पालकमंत्री पदावरील वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका
महाड विधानसभा मतदारसंघाचे मंत्री भरत गोगावले आणि श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या मंत्री आदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदावरून असलेला वाद अद्याप न सुटलेला असतानाच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच महाड नगराध्यक्षपद हे मागास प्रवर्गासाठी राखीव ठरल्याने गोगावले आणि जगताप या दोन्ही घराण्यांना राजकीय अडचणीत आणले आहे.
जगताप कुटुंब राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे निवडणुकीत उतरले असून, सत्ता अबाधित राखण्यासाठी गोगावले शिंदे गटाच्या ताकदीवर रिंगणात उतरणार आहेत.
दहा नगरपरिषदांची निवडणूक — उमेदवार ‘गुलदस्त्यात’
रायगड जिल्ह्यातील महाड, श्रीवर्धन, रोहा, मुरुड, अलिबाग, पेण, खोपोली, कर्जत, माथेरान आणि उरण या दहा नगरपरिषदांच्या निवडणुका होत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत असली तरी सर्वच पक्षांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अद्याप गुलदस्त्यात आहेत. काही पक्षांना योग्य उमेदवार मिळण्यात अडचणी येत असून, नाराज कार्यकर्त्यांना दुसऱ्या पक्षांत ओढण्याचे प्रयत्न शेवटच्या दिवसापर्यंत सुरू राहतील, अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
सत्ताधारी पक्षातील गटबाजी – स्वबळावर लढण्याची शक्यता
शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भारतीय जनता पक्ष हे तिन्ही पक्ष राज्य व केंद्र सत्तेत असले तरी, महाड नगरपरिषदेची सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी प्रत्येक पक्ष स्वतंत्र रणनीती आखत आहे. अंतर्गत मतभेद आणि प्रबळ आर्थिक शक्ती असलेल्या नेत्यांचा प्रभाव पाहता, नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी आर्थिक सामर्थ्याच्या आधारावर ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षांत नाराजीचा सूर तीव्र होत आहे.
गोगावले गटात उमेदवारीवरून गोंधळ
मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही गोगावले विरुद्ध जगताप अशी थेट लढत रंगण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाकडून माजी नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांच्या नावाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता मिळाल्याचे बोलले जात आहे. तथापि, कविस्कर यांच्या प्रकृतीमुळे माजी नगरसेवक नितीन पावले यांच्या नावावरही चर्चा सुरू आहे. शिंदे गटातील काही कार्यकर्त्यांकडून कविस्करांनी निवडणूक लढू नये, अशी मागणी होत असून, या पार्श्वभूमीवर गोगावले यांना अंतर्गत नाराजीचा सामना करावा लागणार असल्याचे संकेत आहेत.
जगताप कुटुंबाची रणनीती – तटकरे ठरणार निर्णायक
दुसरीकडे, जगताप कुटुंबाने सुदेश कळमकर यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, निवडणुकीसाठी लागणारी आर्थिक रसद तटकरे यांच्याकडून येणार असल्याने, अंतिम निर्णय त्यांच्याच मर्जीनुसार होईल, अशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे.
तटकरे हे ‘किंगमेकर’ म्हणून भूमिका बजावतील का, हा प्रश्न चर्चेचा विषय ठरला आहे.
इतर पक्षांची स्थिती
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून माजी विरोधी पक्षनेते चेतन (बंटी) पोटफोडे यांनी मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. शहर प्रमुख मंगेश देवरुखकर यांनाही पक्षाने तयारीचे आदेश दिले आहेत. तर भाजपकडून माजी विरोधी पक्षनेते बिपिन महामुनकर यांच्या पत्नीला उमेदवारी मिळण्याची शक्यता असून, सर्व २० जागांवर उमेदवार उभे करण्याचा पक्षाचा मानस आहे. दरम्यान, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि मनसे या पक्षांकडून मात्र अद्याप कोणतीही ठोस हालचाल दिसत नाही.
महाडच्या गल्लीबोळांपासून बार-रेस्टॉरंटपर्यंत चर्चा तापली
महाड शहरात निवडणुकीचा माहोल शिगेला पोहोचला आहे. वडापावच्या गाड्यांपासून ते चायनीज सेंटर, भेळपुरीच्या ठेल्यांपासून ते रात्रीच्या रंगीबेरंगी रेस्टॉरंटपर्यंत “गोगावले विरुद्ध तटकरे” या लढतीची चर्चा रंगली आहे.
राजकीय वर्तुळातही “तटकरे हेच पडद्यामागचे सूत्रधार” असल्याचे बोलले जात असून, या निवडणुकीत तटकरे यांचा प्रभाव संपूर्ण रायगड जिल्ह्यात किती परिणामकारक ठरेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
एकंदरीत, महाड नगरपरिषदेची निवडणूक ही फक्त स्थानिक सत्ता नव्हे, तर महाड आणि रायगडच्या राजकीय समीकरणांचा कस लावणारी चुरशीची लढत ठरणार आहे.
