• Thu. Jan 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

बाहे गावाजवळ बिबट्याचे दर्शन; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

ByEditor

Nov 6, 2025

वनविभाग आणि प्रशासनाच्या तत्पर कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात; जनजागृती मोहिमेद्वारे नागरिकांना सूचना

रोहा/धाटाव । शशिकांत मोरे
रोहा तालुक्यातील बाहे गावाजवळ बिबट्याचे दर्शन झाल्याची घटना घडल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, वनविभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या तात्काळ प्रतिसादामुळे परिस्थिती नियंत्रणात आली आहे. ही घटना ६ ऑक्टोबर रोजी रात्री घडली.

सदर घटना पोलीस पाटील मनोज तुकाराम थिटे यांच्या निदर्शनास सर्वप्रथम आली. बाहे येथील मंदार साळवी आणि बाबू जाधव (रा. निवी) यांनी रात्री बिबट्या दिसल्याची माहिती थिटे यांना दिली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वनविभागाशी संपर्क साधला. यानंतर वनरक्षक अक्षय लाटे आणि अंकिता भगत हे खांब येथून घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रात्री सुमारे अकरा ते साडेअकरा वाजेपर्यंत ग्रामस्थांसोबत राहून पाहणी केली. अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने गावाच्या वेशीजवळ आणि शेताच्या कडेला आढळलेले पावलांचे ठसे तपासले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हे ठसे बिबट्याचेच असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले.

घटनास्थळी सागर रेस्क्यू टीम (SVRSS) तर्फे प्रवीण भगत यांनीही उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेतला. ग्रामस्थांनी शांतता राखून प्रशासनाशी सहकार्य केल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. पुढील दिवशी बाहे गावातील मराठी शाळा आणि अंगणवाडीत वनविभाग व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेत नागरिकांना सूचना देण्यात आल्या की —

  • बिबट्या दिसल्यास घाबरू नये.
  • एकट्याने जंगल परिसरात जाणे टाळावे.
  • जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे.
  • कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा.
  • ‘काळजी करण्याचे कारण नाही’ — वनविभाग

या संदर्भात रोहा वनविभागाचे RFO दबडे यांनी सांगितले की, “बाहे गावाजवळ बिबट्याचे दर्शन झाल्याचे खरे आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो की आपले जंगल सदृढ आणि संपन्न आहे. सायंकाळी माहिती मिळाल्यानंतर आमचे अधिकारी अक्षय लाटे आणि अंकिता भगत हे रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थांसोबत होते. त्यांनी ठसे तपासून ते बिबट्याचेच असल्याचे निश्चित केले.”

ते पुढे म्हणाले, “काळजी करण्यासारखे काही कारण नाही. आमचा वनविभाग नेहमीच सतर्क असतो. अधिकारी नियमितपणे जंगल परिसरात गस्त घालत आहेत. तसेच व्हिडिओ आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, पण घाबरू नये.”

वनविभागाकडून पुढील काही दिवस गाव परिसरात पाळत ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी अफवा न पसरवता प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन रोहा वनविभागाने केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!