• Thu. Jan 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रोह्यात ‘आयाराम-गयाराम’ राजकारणाचा जोर; कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ

ByEditor

Nov 6, 2025

जि.प.आणि पंचायत समिती बरोबर नगरपालिका निवडणुकीचेही चित्र बदलणार

“कोणता झेंडा हातात घ्यावा?” कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

धाटाव-रोहा । शशिकांत मोरे
राज्यात सध्या राजकीय अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले असून, दररोज एखादा नेता एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी घेत असल्याने जनतेसह कार्यकर्तेही गोंधळात पडले आहेत. “नेमका कोण कुठल्या पक्षात आहे?” हा प्रश्न आता सर्वसामान्य मतदारांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांना पडला आहे.
राजकारणातील ‘पक्षनिष्ठा’ केवळ कागदावर राहिली असून, ‘आयाराम-गयाराम’ संस्कृतीला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र रोहा तालुक्यात दिसत आहे.

राज्यातील राजकीय उलथापालथ रोह्यापर्यंत

निवडणूक आयोगाने अवघ्या दोन दिवसांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.
महाविकास आघाडीतील काही नेते पूर्वीच महायुतीत दाखल झाले आहेत. मात्र, आता महायुतीतील काही नेते आणि पदाधिकारी देखील आपापल्या मित्र पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. त्यामुळे राज्यातीलच नव्हे, तर रोहा तालुक्यातील राजकीय समीकरणेही जलदगतीने बदलत आहेत.

रोहा नगरपालिकेत तटकरे विरुद्ध महायुती संघर्षाची चाहूल

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या ताब्यातील रोहा नगरपरिषद सध्या राष्ट्रवादीच्या नियंत्रणाखाली आहे. मात्र, या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) सज्ज झाली आहे. तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाचे नेतृत्व नव्या जोमाने संघटन मजबूत करण्यावर भर देत असून, आगामी निवडणुकीसाठी “हुकूमत मोडून काढण्याचा” चंग बांधला आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे काही नवखे चेहरेही नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.

दुसरीकडे, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे या पक्षांकडूनही मोर्चेबांधणीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

ग्रामीण भागातही पक्षांतराचा खेळ

रोहा तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश सुरू असल्याने कार्यकर्त्यांमध्ये एक नवी समीकरणे तयार होत आहेत. गावागावात बैठका आणि गुप्त चर्चा रंगत असून, या हालचालींचा थेट परिणाम शहरी भागातील राजकारणावर होत आहे.
काही ठिकाणी एकाच कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या पक्षात कार्यरत असल्याने राजकीय साखळी नातेसंबंधातून बळकट होताना दिसत आहे.
यामुळे जिल्हा परिषदेपासून पंचायत समिती आणि नगरपरिषदेपर्यंत निवडणुकीचे चित्र पूर्णपणे बदलण्याची चिन्हे आहेत.

कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

सतत होणाऱ्या पक्षांतरामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. “नेमका कोणता झेंडा हातात घ्यावा?” हा प्रश्न अनेक जुन्या कार्यकर्त्यांसमोर उभा राहिला आहे. स्थानिक पातळीवर गटबाजी आणि वैयक्तिक संबंधांवर आधारित पक्षनिष्ठा निर्माण झाल्याने प्रत्येक गावात नव्या राजकीय समीकरणांचा खेळ सुरू आहे.

राज्यातील सत्ताबदलानंतर महायुती आणि महाविकास आघाडीतील अंतर्गत तणाव आता स्थानिक पातळीवर स्पष्टपणे जाणवू लागला आहे. रोहा तालुक्यातील ही परिस्थिती आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांवर निर्णायक प्रभाव टाकू शकते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
राजकारणातील ‘स्थैर्य’ हरवून ‘संधीवाद’ वाढल्याचे चित्र या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

एकंदरीत, रोहा तालुक्यातील राजकारण सध्या पूर्णपणे उकळत्या टप्प्यात आहे. दररोज होणारी पक्षांतरं आणि बदलती निष्ठा पाहता, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका या ‘गोंधळलेल्या राजकारणाचा’ प्रत्यक्ष आरसा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!