नागोठणे | महेंद्र म्हात्रे
रायगड जिल्ह्यातील नागोठणे कोळीवाडा परिसरात झालेल्या अपघातात एका ७२ वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना बुधवारी (दि. ५ नोव्हेंबर २०२५) दुपारी बारा वाजून ३९ मिनिटांच्या सुमारास घडली. अपघातानंतर एस.टी. बसचालक घटनास्थळावरून फरार झाला असून नागोठणे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, एस.टी. बस (क्र. एम.एच.२० बी.एल.३२३९) ही पालीहून पेणकडे जात होती. बस मौजे नागोठणे कोळीवाडा येथील सलीम मटनवाल्याच्या दुकानासमोर पोहोचली असता, समोरून येणाऱ्या युनिकॉन मोटारसायकलला (क्र. एम.एच.०६ सी.ए. ४१४९) बसने मारल्याने अपघात झाला. या मोटारसायकलवर मागे बसलेले शांताराम दामा गायकवाड (वय ७२, रा. रूम क्र. ३०२, अ-४ गुलमोहर बिल्डिंग, सरोवर दर्शन सोसायटी, रायगड आळी, ठाणे, मूळ रहाणार देऊळवाडी, ता. सुधागड) हे खाली पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर बसचालकाने घटनास्थळावर थांबण्याऐवजी अपघाताची खबर न देता पळ काढला. या घटनेनंतर नागोठणे पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५४/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६(१), २८१ १२५ (अ), १२५(ब) मोटार वाहन कायद्यानुसार दाखल करण्यात आला आहे.
सदर अपघाताचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार रुईकर करीत आहेत.
या गंभीर अपघाताच्या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
