नागोठणे | प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील नागोठणे बाजारपेठेत पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे ११ लाख ४६ हजार रुपयांचा गुटखा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. ५ नोव्हेंबर २०२५) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
या प्रकरणी हर्षिल अशोक पटेल (वय ३६, रा. आंगारआळी, ता. रोहा, जि. रायगड) या व्यक्तीविरुद्ध नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५५/२०२५ नोंदविण्यात आला आहे. गुन्हा भारतीय दंड संहिता कलम १२३, २२३, २७५(३)(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम २६(२), २६(४) आणि अधिसूचना क्र. ५००/७ जुलै २०११ अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.
नागोठणे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील नेहल किराणा स्टोअर येथे पोलिसांनी छापा टाकला असता, दुकानातून “केसरयुक्त विमल पान मसाला” या नावाचे ७४ चॉकलेटी रंगाचे पॅकेट आढळून आले.
या प्रत्येक पॅकेटची छापील किंमत १९८ रुपये असून, एकूण १४,६५२ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच आरोपीकडून “V-1 तंबाखू” नावाचे आणखी १६२८ रुपयांचे पॅकेटही जप्त करण्यात आले.
पोलिस तपासात उघड झाले की आरोपी मानवी आरोग्यास अपायकारक तंबाखूजन्य गुटखा विक्रीसाठी बेकायदेशीररीत्या साठवून ठेवत होता. महाराष्ट्र शासनाने जुलै २०११ मध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार राज्यभरात गुटखा, पानमसाला आणि तत्सम पदार्थांच्या साठा व विक्रीवर बंदी आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणात दुसरा आरोपी ओमसाई (पूर्ण नाव अज्ञात), रा. आमटेम, ता. पेण, जि. रायगड याने आरोपी क्रमांक १ कडून हा गुटखा खरेदी केल्याचे पोलिस तपासात समोर आले असून, तो सध्या फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास स.पो.नि. सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील करीत आहेत.
आरोग्यास अपायकारक पदार्थांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा
नागोठणे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू यांसारखे प्रतिबंधित पदार्थ विक्री किंवा साठवणूक केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. मानवी आरोग्यास धोका पोहोचवणाऱ्या पदार्थांच्या विक्रेत्यांना अटक करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत.
