अलिबाग | सचिन पावशे
भारतीय जनता पक्षाने दक्षिण रायगडमधील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी तयारी सुरू केली असून, या पार्श्वभूमीवर पक्षाचे वरिष्ठ नेते सतीश धारप यांची दक्षिण रायगड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या आदेशानुसार, सतीश धारप यांच्या नेतृत्वाखाली आता अलिबाग, पेण, मुरूड, रोहा, श्रीवर्धन आणि महाड या तालुक्यांतील नगरपरिषद, नगरपंचायती आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे नियोजन, प्रचार मोहीम आणि उमेदवार समन्वयाची जबाबदारी राहणार आहे.
संघटनात्मक तयारीस गती भाजप प्रदेश नेतृत्वाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी संघटनात्मक तयारी वाढविण्याचे आदेश दिले असून, धारप यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण रायगडात पक्षाची ताकद अधिक दृढ करण्यावर भर दिला जाणार आहे.
ते लवकरच तालुकावार बैठका घेऊन निवडणूक नियोजन, कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण आणि प्रचार धोरण यावर चर्चा करणार आहेत.
“पक्षाने दाखविलेल्या विश्वासाला मी पात्र ठरेन. कार्यकर्त्यांच्या बळावर आणि विकासाच्या ध्येयाने प्रेरित होऊन दक्षिण रायगडात भाजप अधिक बळकट करू,”
— सतीश धारप,
निवडणूक प्रमुख, दक्षिण रायगड
स्थानिक मुद्द्यांवर भर
सतीश धारप यांनी सांगितले की, या निवडणुकीत भाजप स्थानिक पातळीवरील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा आणि पर्यटनविकास या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करणार आहे. मतदारसंघातील नागरिकांशी थेट संवाद साधून विकासाच्या अजेंड्यावर पक्ष काम करेल.
सतीश धारप यांची निवड हा पक्षासाठी संघटनशक्ती मजबूत करण्याचा टप्पा मानला जात असून, आगामी निवडणुकांमध्ये दक्षिण रायगड भाजपसाठी निर्णायक ठरणार असल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे.
