• Mon. Dec 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

खड्डेमुक्तीसाठी युवासेनेचा आक्रमक पवित्रा!

ByEditor

Nov 12, 2025

विपुल उभारे यांच्या इशाऱ्यानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील कामास वेग

सलीम शेख
माणगाव, (दि. १२) :
मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड – भुवन फाटा ते कशेणे या दरम्यानच्या रस्त्यावरील धोकादायक खड्ड्यांमुळे प्रवाशांचे हाल होत होते. मात्र शिवसेना युवासेनेचे दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांनी या गंभीर विषयावर घेतलेली तातडीची भूमिका व दिलेला इशारा यामुळे अखेर संबंधित ठेकेदाराला जाग आली आहे. सध्या या परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे बुजविण्याचे काम सुरू असून, कशेणे गावाजवळील बायपास परिसरात रस्ता खड्डेमुक्त करण्याचे काम गतीने सुरू आहे. या तातडीच्या कृतीबद्दल प्रवासी नागरिकांनी विपुल उभारे यांच्या पुढाकाराचे कौतुक करत आभार मानले आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेणे गावाजवळील बायपास रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून खोल आणि धोकादायक खड्डे पडले होते. या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात एकामागोमाग तीन वाहनांची चेन-अपघातासारखी धडक झाली होती. यात वाहनांचे मोठे नुकसान झाले, सुदैवाने जीवितहानी टळली. नेमके त्याच वेळी युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे हे माणगावहून इंदापूरकडे जात असताना त्यांनी हा प्रकार प्रत्यक्ष पाहिला. त्यांनी तत्काळ अपघात स्थळी भेट देऊन महामार्गाच्या संबंधित ठेकेदाराला आठ दिवसात खड्डे न भरल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा ठाम इशारा दिला होता. श्री. उभारे यांच्या इशाऱ्यानंतर प्रशासन आणि ठेकेदार यांना जाग आली आणि दुसऱ्याच दिवशी खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले. कशेणे बायपास परिसरात कामाला वेग आला असून, काही ठिकाणी खड्डे पूर्णपणे बुजविण्यात आले आहेत.मुंबई-गोवा महामार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवासी, दुचाकीस्वार आणि वाहनचालक यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. अनेकदा अपघात घडून जीवितहानीचीही वेळ येत होती. या पार्श्वभूमीवर युवासेनेने घेतलेली ही आक्रमक भूमिका सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी महत्त्वाची ठरली आहे.

कोलाड नाका, तळवली, भुवन फाटा, इंदापूर आणि कशेणे या ठिकाणी धोकादायक खड्ड्यांची संख्या लक्षणीय होती. मात्र आता या भागात खड्डेमुक्तीचे काम सुरू झाल्याने वाहतूक सुरळीत झाली आहे. युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांनी सांगितले की, “सामान्य प्रवासी आणि वाहनचालक यांचा त्रास आम्ही डोळ्यांसमोर पाहिला. प्रशासनाने लोकांच्या जीवाशी खेळणारी ही परिस्थिती गांभीर्याने घ्यावी. आमचा इशारा हे आंदोलनाचे पहिले पाऊल होते. जर पुन्हा दुर्लक्ष झाले, तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू. ” युवासेनेच्या या निर्णायक पावलामुळे स्थानिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, जर असेच जबाबदारीने जनहिताचे मुद्दे हाताळले गेले, तर महामार्ग खरोखरच “जीवघेणा” न राहता “सुरक्षित प्रवास मार्ग” बनेल.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!