उरण । घन:श्याम कडू
उरण तालुक्याचा भोपाळ होण्याचा प्रसंग थोडक्यात टळला आहे. IOTL प्रकल्पाच्या तेलवाहक पाईपलाईनला पागोटे पुलाखाली भलेमोठं छिद्र पडल्याने हजारो लिटर पेट्रोल बाहेर आलं. क्षणात परिसरात एकच खळबळ उडाली आणि प्रशासनाच्या सर्व यंत्रणा हलत्या झाल्या. यामुळे रेल्वे व वाहतूक काही वेळेसाठी बंद करण्यात आली होती.
नाल्यात ओसंडून वाहणाऱ्या पेट्रोलमुळे परिसर पेट्रोलच्या वाफांनी भरून गेला होता. अग्निशमन दल, पोलीस, IOTL अधिकारी आणि आपत्कालीन पथकांनी युद्धपातळीवर सक्शन पंपांच्या सहाय्याने पेट्रोल उपसण्याचं काम सुरू केलं. तरीही या घटनेमुळे परिसरात भीतीचं सावट पसरलं आहे. काही काळ वाहतूक व रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली होती.
पाईपलाईनच्या अगदी शेजारीच रेल्वे लाईन असल्याने रेल्वे सेवा तात्पुरती बंद ठेवण्यात आली होती. १२.३० ते ४.३० या वेळेत रेल्वे सेवा पूर्ण ठप्प राहिली, अशी माहिती उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलाणी यांनी दिली. आग लागण्याचा धोका ओळखून परिसरातील टपऱ्या व दुकाने देखील बंद करण्यात आली आहेत.
पत्रकारांना स्थळावर फोटो काढण्यास मनाई करण्यात आली, तर IOTL अधिकाऱ्यांनी “कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही” अशी भूमिका घेतल्याने संशय अधिकच गडद झाला आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणी यापूर्वी तेलचोरांकडून टॅपिंग करून चोरी करण्यात आली होती. त्यामुळे हा प्रकार अपघाती नसून तेलचोरांच्या नव्या डावाची पुनरावृत्ती तर नाही ना, असा सवाल उपस्थित झाला आहे.
दररोज या ठिकाणी डझनभर ट्रेलर ड्रायव्हर आपली वाहने उभी करून जेवण घेतात. जर या पेट्रोलच्या वाफांना जरा तरी आग लागली असती, तर उरणच्या द्रोणागिरी परिसरात भोपाळसदृश स्फोटक दुर्घटना घडली असती. त्याची झळ संपूर्ण रायगड जिल्ह्याला बसली असती.
IOTL अधिकाऱ्यांनी ‘फ्लेम वेपर’चे प्रमाण शून्य झाल्याचं प्रमाणपत्र दिल्यानंतर रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सध्या लिकेज सील करण्याचं काम सुरू आहे आणि वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुलानी यांनी दिली आहे.
या घटनेतून उरणकर आजही ज्वालामुखीच्या टोकावर जगत आहेत. तेलवाहक प्रकल्प, गॅस टर्मिनल्स आणि रासायनिक साठे यांच्या वेढ्यात राहणाऱ्या नागरिकांचं आयुष्य आजही एका ठिणगीच्या दयेवर टिकलेलं आहे. प्रशासनाने यापुढे तरी जागं व्हावं, हीच जनतेची माफक अपेक्षा आहे.
