श्रीवर्धन | अनिकेत मोहित
श्रीवर्धन शहरात कालपासून एका संशयास्पद ‘ट्रॅफिक पोलिस चालान’ या नावाने व्हॉट्सॲपवर लिंक फिरत असून ती उघडल्यावर मोबाईल क्रमांक व व्हॉट्सॲप अकाऊंट हॅक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या माध्यमातून आर्थिक व वैयक्तिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या संदर्भात भूमिपुत्र संघटना, श्रीवर्धन यांनी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली असून ऑनलाइन सायबर सेलकडेही नोंद घेण्यात आली आहे.
या लिंकमुळे अनेक युवकांचे व्हॉट्सॲप अकाऊंट हॅक झाल्याची प्रकरणे स्थानिक पातळीवर दिसून आली आहेत. संबंधित लिंक ‘ट्रॅफिक पोलिस’च्या नावाने असल्यामुळे अनेकांनी ती अधिकृत समजून उघडली, परंतु ती हॅकर्सकडून तयार करण्यात आल्याचे लक्षात येताच नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
भूमिपुत्र संघटनेच्या प्रतिनिधींनी श्रीवर्धन पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, “या प्रकारामागे कोणते गट कार्यरत आहेत, याचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच नागरिकांना त्वरित सतर्कतेचा इशारा देण्यात यावा.”
सदर तक्रारीची नोंद घेत पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, सायबर तज्ञांनी नागरिकांना कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक न करण्याचे, व्हॉट्सॲपवर आलेले ओटीपी किंवा वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर न करण्याचे आवाहन केले आहे.
पोलिसांकडूनही नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, “जर अशा संशयास्पद लिंक प्राप्त झाल्या असतील तर त्या त्वरित डिलीट कराव्यात आणि संबंधित माहिती पोलिस ठाण्यात द्यावी.”
श्रीवर्धनमध्ये अशा प्रकारचा सायबर फसवणुकीचा प्रकार प्रथमच समोर आल्याने नागरिकांमध्ये सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
