• Tue. Dec 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगडच्या राजकारणातील संस्कारांचा दर्जा खालावला

ByEditor

Nov 11, 2025

हरवली सभ्यता, बहरली वैयक्तिक टीका! समस्यांकडे दुर्लक्ष, तत्वं झाली कवडीमोल

माणगाव । सलीम शेख

रायगड जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा, बळिराजाच्या कष्टांचा आणि विचारांच्या संस्कृतीचा मानबिंदू. हाच रायगड एकेकाळी शालीनतेसाठी, विचार प्रधानतेसाठी आणि राजकीय संस्कारांसाठी ओळखला जात होता. या भूमीवर लोकशाहीचा पाया विचारांवर बांधला गेला होता, पण आजच्या वास्तवात ती भिंत तडे गेलेली दिसते.

काळ बदलला आणि त्याबरोबर राजकीय भाषाही बदलली. सभ्यतेचा गंध ओसरला, विचारांचा सूर हरवला. आता राजकारण म्हणजे वैयक्तिक हल्ले, अपमानास्पद शब्द, आणि सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणारे व्यवहार.. एवढ्यावरच मर्यादित राहिले आहे. पूर्वी विधानसभेत दिग्गज नेते चर्चेत सहभागी होताना सुसंस्कृतता आणि परिपक्वतेचा आदर्श देत. विरोधकांवर टीका करतानाही त्यांनी मर्यादा ओलांडल्या नाहीत. त्यांच्या भाषणात विचार होता, सभ्यता होती, आणि प्रामाणिकतेचा ठसा होता. आज त्या परंपरेचा वारसा जपणारे मोजकेच आहेत. त्यात खासदार सुनील तटकरे यांचे नाव अग्रस्थानी येते.

पुर्वी विधानसभा आणि आता लोकसभेत त्यांनी कधीही वैयक्तिक पातळीवर टीका केली नाही. उलट रायगडच्या विकासाच्या मुद्यांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला, रस्ते, दिघी बंदर, औद्योगिक गुंतवणूक, रोजगार निर्मिती, पर्यटन, दिल्ली मुंबई कॉरिडॉर, औद्योगिक प्रकल्प, शैक्षणिक सुविधा, मुंबई गोवा महामार्ग, मराठी भाषा, पर्यावरणसंवर्धन यांसारख्या विषयांवर ठाम मते मांडली. त्यांच्या भाषेत संयम आहे, विचार आहे आणि लोकहिताची तळमळ आहे. पण दुसरीकडे, जिल्ह्यातील अनेक नेत्यांच्या वक्तव्यात आता विचारांपेक्षा वैयक्तिक टोमणे आणि आरोपांचे वादळ दिसते.

सभागृहात आणि जनसभांमध्ये शब्दांचा सन्मान उरलेला नाही. मतभेदांऐवजी वैर जपले जाते, विचार मांडणाऱ्यांना धमक्या दिल्या जातात, आणि काही ठिकाणी तर मारहाणही होते. हा लोकशाहीचा लाजिरवाणा क्षण आहे. राजकारण हे विचार, संघर्ष आणि लोकहिताचे माध्यम असावे, पण आता ते सत्तेचा बाजार झाला आहे. पक्षांतर, पदलालसेची शर्यत आणि खोट्या आश्वासनांच्या धुरात मतदारांची फसवणूक केली जाते. निवडणुकीच्या आधी गोड बोलून मतदारांना भूलथापा देणारे अनेक राजकारणी, निवडून आल्यावर मात्र जनतेच्या प्रश्नांकडे कानाडोळा करतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक प्रश्न अनिवार्यपणे उभा राहतो. रायगडचा आत्मा कुठे हरवला? हा तोच रायगड आहे ना, जिथे राजकारण हे समाजसेवेचे साधन होते, जिथे मतभेद असूनही परस्पर सन्मान होता, आणि जिथे राजकीय नेते जनतेच्या समस्यांकडे संवेदन शीलतेने पाहत होते? आजची पिढी यांच्यासारख्या राजकारणाकडून प्रेरणा घेईल का की तिरस्कार करेल? जर हे असेच चालू राहिले, तर भावी पिढी सभ्यतेचे धडे कुठून शिकेल?

रायगडच्या लोकशाहीला पुन्हा एकदा संस्कार, सभ्यता आणि वैचारिकतेचा श्वास द्यायचा असेल, तर नागरिकांनी सजग व्हायला हवे. टीका करा, पण ती विचारांवर करा. लोकशाहीला वाचवायचे असेल, तर आधी सभ्यतेचा पुनर्जन्म घडवावा लागेल. कारण “राजकारण सभ्य असेल तरच समाज प्रगत होतो; आणि राजकारण खालच्या पातळीवर गेलं, तर संपूर्ण समाज अंधारात हरवतो.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!