दिवाळी उत्साहात इतिहास जागवणारा उपक्रम
श्रीवर्धन। अनिकेत मोहित
रोहा येथील सकल मराठा समाज, रोहा तालुका यांच्या वतीने आयोजित दक्षिण रायगड जिल्हास्तरीय भव्य किल्ला बांधणी स्पर्धेत श्रीवर्धनच्या एकविरा क्रीडा मंडळाने उल्लेखनीय कामगिरी करत चतुर्थ क्रमांक पटकावला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या स्पर्धेत जिल्हाभरातील अनेक संघांनी सहभाग नोंदवला होता.
एकविरा क्रीडा मंडळाने साकारलेला ‘किल्ले पुरंदर’ हा आकर्षक आणि ऐतिहासिक किल्ल्याचा देखावा प्रेक्षकांचे तसेच परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत होता. किल्ल्याचे सुबक बांधकाम, ऐतिहासिक अचूकता आणि मुलांनी दाखवलेली कल्पकता यामुळे मंडळाची दखल घेतली गेली.
या उपक्रमामुळे मुलांमध्ये इतिहासाबद्दलची जाण, किल्ल्यांप्रती जिव्हाळा आणि शिवकालीन वारशाचा अभिमान जागृत होत असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले. दिवाळीच्या सणाला सांस्कृतिक आणि शैक्षणिक अंगाने समृद्ध करणारा हा उपक्रम असल्याचेही त्यांनी सांगितले.
या स्पर्धेत श्रीवर्धनचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुलांमध्ये स्वानंद पोरनाक, नील शिगवण, सनी चाचले, सोहम गुरव, सार्थक वाणी, स्मिथ वाडिया, दर्शन जोशी, तनुज गुरव, आदित्य गुरव, प्रसाद गुरव, अजित चाचले, पारस पोरनाक, रुद्र गुरव, वीर गुरव आणि पूर्वेश शिगवण यांचा समावेश होता. मुलांच्या मेहनतीचे आणि एकविरा क्रीडा मंडळाच्या संघभावनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
श्रीवर्धनच्या तरुणाईने इतिहास जिवंत ठेवत दिवाळीला एक वेगळे सांस्कृतिक रूप दिल्याने स्थानिक पातळीवर समाधानाचा सूर उमटत आहे.
