आठ वारकरी जखमी; आळंदी वारीत हाहाकार
उरण । अनंत नारंगीकर
उरण येथून आळंदीच्या कार्तिकी वारीसाठी निघालेल्या दावजी पाटील दिंडीत कामशेत घाटात कंटेनर ट्रेलर घुसल्याने झालेल्या भीषण अपघातात उरण करळ येथील मंजुळा प्रभाकर तांडेल (वय 53) यांचा जागीच मृत्यू झाला. तर दिंडीत सहभागी असलेल्या आठ वारकरी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर महावीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उरण येथील दावजी पाटील दिंडी कार्तिकी वारीसाठी आळंदीच्या दिशेने रवाना झाली होती. या दिंडीत सुमारे 150 वारकरी सहभागी होते. कामशेत घाटातील एका अवघड वळणावरून उतरत असलेला कंटेनर ट्रेलर अचानक दिंडीत घुसला. अचानक झालेल्या या धडकेने दिंडीत एकच गोंधळ उडाला. भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि वारकऱ्यांमध्ये हाहाकार माजला.
या भीषण अपघातात मंजुळा तांडेल या वारकरी महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर आठ वारकरी गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून, महावीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
दरम्यान, अपघाताची बातमी करळ गावात पोहोताच गावावर शोककळा पसरली. मोठ्या दु:खद वातावरणात मंजुळा तांडेल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
