उरण । घनःश्याम कडू
उरण नगरपालिकेच्या सत्तेची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणुकीची रणशिंगे वाजली असून, आजपासून म्हणजे सोमवार दि. 10 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यानंतर उरणच्या गल्लीबोळात राजकीय तापमान चांगलेच चढले असून, कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
उरण नगरपालिकेतील एकूण 10 प्रभागांतून 21 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्षा असे 22 जनप्रतिनिधी निवडून देण्यात येणार आहेत. नगराध्यक्षा पद महिला राखीव असल्याने राजकीय पक्षांच्या गणितात उलथापालथ झाली असून, प्रत्येक पक्षाला योग्य महिला उमेदवार शोधण्यासाठी धडपड करावी लागत आहे. या निवडणुकीत एकूण 13,311 पुरुष आणि 12,903 महिला असे मिळून 26,214 मतदारांचे भवितव्य ठरणार आहे. हे मतदारच आता उरण नगरपालिकेच्या गादीवर कोण बसवायचे हे ठरवतील.
प्रभागनिहाय मतदारसंख्या पाहिली असता प्रभाग क्रमांक 1 मध्ये पुरुष 1605, महिला 1706, प्रभाग 2 मध्ये पुरुष 1549, महिला 1613, प्रभाग 3 मध्ये पुरुष 1252, महिला 1168, प्रभाग 4 मध्ये पुरुष 1416, महिला 1321, प्रभाग 5 मध्ये पुरुष 1298, महिला 1268, प्रभाग 6 मध्ये पुरुष 1010, महिला 1049, प्रभाग 7 मध्ये पुरुष 1566, महिला 1388, प्रभाग 8 मध्ये पुरुष 955, महिला 893, प्रभाग 9 मध्ये पुरुष 1148, महिला 1145, आणि प्रभाग 10 मध्ये पुरुष 1512, महिला 1352 अशी मतदारांची आकडेवारी आहे.प्रभाग 1 ते 9 मधून प्रत्येकी 2 नगरसेवक, तर प्रभाग 10 मधून 3 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. त्यासोबतच संपूर्ण उरण शहराच्या नेतृत्वासाठी एका नगराध्यक्षा पदासाठी निवडणूक होणार आहे.2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, निकाल 3 डिसेंबर रोजी घोषित केला जाणार आहे. त्यामुळे केवळ काही आठवड्यांतच उरणच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे. नगराध्यक्षा पद महिला राखीव असल्याने भाजप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस आणि स्थानिक गटांमध्ये उमेदवार निवडीसाठी हालचालींना वेग आला आहे. शहरात सध्या एकच चर्चा रंगली आहे. उरण नगरपालिकेच्या गादीवर कोण बसणार?
मागील निवडणुकीतील सत्तासंतुलन लक्षात घेता यंदाची निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे. राजकीय नेतेमंडळी आता गोटे मांडू लागले आहेत, तर मतदारांच्या मनात विविध अपेक्षा आणि नाराजीही साचलेली आहे.उरणकरांच्या बोटावर आता नगराध्यक्षा आणि नगरसेवकांचे भवितव्य तोलले जाणार आहे. उरणच्या राजकारणातील ही निवडणूक फक्त सत्ता बदलाची नव्हे, तर उरणच्या विकासाच्या दिशेचा निर्णय घेणारी ठरणार आहे.
