• Tue. Dec 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण तालुक्यात धक्कादायक प्रकार, ९० वर्षांच्या वृद्धेचा रहस्यमय मृत्यू!

ByEditor

Nov 10, 2025

डोक्यामागे गंभीर जखमा, गावात खळबळ; उरण पोलिसांकडून तपास सुरू!

उरण । घन:श्याम कडू

उरण पोलीस ठाणे हद्दीतील मोठे भुम गावात रविवारी मध्यरात्री एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. गावातील ९० वर्षांच्या हिराबाई जनार्दन जोशी या वृद्ध महिला आपल्या राहत्या घरी मृत अवस्थेत आढळून आल्या. विशेष म्हणजे, त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर जखमा आढळून आल्याने परिसरात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही घटना काल रविवार, दिनांक ९ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे १.२५ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मृत महिला एकट्याच राहत असून त्यांना मुलगा नसून तीन मुली व एक पुतण्या आहे. पुतण्याने तक्रार नोंदविताना, वृद्ध महिला पडून जखमी होऊन मृत झाल्याची माहिती दिल्याने उरण पोलीस ठाण्यात एडीआर क्रमांक १००/२५ नोंद करण्यात आला आहे.

घटनास्थळी फॉरेन्सिक पथक व आय-बाईक टीमला बोलावून पंचनामा करण्यात आला आहे. मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले असून अहवालाची प्रतीक्षा आहे. नेमक्या जखमा कशामुळे झाल्या, हे स्पष्ट होण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

या घटनेने मोठेभुम गावात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. वृद्धेचा मृत्यू अपघाती की संशयास्पद? याचे उत्तर आगामी तपासानंतरच मिळणार आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!