सुरेश महाबळे यांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश; तटकरे गटात खळबळ
कोलाड । विश्वास निकम
कोलाड परिसरातील राजकारणात मोठी खळबळ उडवत खा. सुनिल तटकरे यांचे जुने आणि विश्वासू कार्यकर्ते, आंबेवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुरेशदादा महाबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याग करून शिवसेना (शिंदे गट)मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. रविवारी (दि. ९ नोव्हेंबर) सायंकाळी ६ वाजता आंबेवाडी नाका येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात त्यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला.
महाबळे यांचा शिंदे गटात प्रवेश ही केवळ एका नेत्याची राजकीय शिफ्ट नसून राष्ट्रवादीच्या स्थानिक संघटनेला बसलेला मोठा धक्का मानला जात आहे. तटकरे गटाचा परंपरागत गड समजल्या जाणाऱ्या कोलाड परिसरात शिवसेना (शिंदे गट)ची ताकद लक्षणीयरीत्या वाढेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

भव्य सोहळ्यात पक्षप्रवेश
आंबेवाडी नाका परिसर गर्दीने खचाखच भरला होता. महाबळे यांचे समर्थक, महिला, युवक, ज्येष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व मिठागरे विकास राज्यमंत्री भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र दळवी, तालुका प्रमुख मनोजकुमार शिंदे, उपतालुका प्रमुख चंद्रकांत जाधव, विजय बोरकर, मोरेश्वर जाधव यांसह शिंदे शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
महाबळे यांच्या प्रवेशावेळी घोषणाबाजी, टाळ्यांचा कडकडाट आणि ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी माजी पंचायत समिती सभापती सुनीता महाबळे, झुंजार शिवसैनिक चंद्रकांत लोखंडे, माजी पंचायत समिती सदस्या चेतना लोखंडे, मंगेश सरफळे, महेंद्र वाचकवडे, संजय कुर्ले, सुशिल ढवळे आणि असंख्य कार्यकर्त्यांनीही औपचारिकरित्या पक्षप्रवेश जाहीर केला.

“रायगड बदलतोय, कोलाडही बदलतंय” -मनोजकुमार शिंदे
समारंभात बोलताना तालुका प्रमुख मनोजकुमार शिंदे यांनी महाबळे यांच्या प्रवेशाचे स्वागत करत म्हटले, “रायगड बदलतोय. आम्ही रोहा बदलला, आता कोलाड बदलत आहे. दबावाखाली राहून काम करणारे अनेक कार्यकर्ते आता बाहेर पडत आहेत. सुरेशदादा महाबळे यांनी आमच्यावर विश्वास ठेवून प्रवेश केला आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी शंभर टक्के प्रामाणिकपणे उभे राहू.”
या वक्तव्यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून अनुमोदन दिले.
“जैसी करनी, वैसी भरनी” -मंत्री भरतशेठ गोगावले
राष्ट्रवादीतील नवीन नेतृत्व, पार्थ पवार व धनंजय मुंडे यांच्यावर लागलेल्या आरोपांबाबत माध्यमांनी प्रश्न उपस्थित केल्यावर मंत्री भरतशेठ गोगावले यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “आम्ही केवळ वस्तुस्थिती जनतेसमोर मांडतो. जैसी करनी, वैसी भरनी, परिस्थिती तशीच चालली आहे. काही जणांनी वर्षानुवर्षे लोकांचे नेतृत्व केले, पण कार्यकर्त्यांचा आवाज ऐकला नाही. कार्यकर्त्यांना न्याय मिळावा म्हणून ते आमच्याकडे येत आहेत.”
गोगावले यांनी महाबळे यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाची ताकद कोलाड व परिसरात मोठ्या प्रमाणात वाढेल, असेही सांगितले.
“३९ वर्षांची प्रामाणिक सेवा दुर्लक्षित” -सुरेशदादा महाबळे
स्टेजवर उभे राहून सुरेशदादा महाबळे यांनी अतिशय थेट आणि भावनिक शब्दांत राष्ट्रवादी सोडण्याची कारणे मांडली. “गेल्या ३९ वर्षांत राष्ट्रवादी पक्षाच्या वाढीसाठी आम्ही रात्रंदिवस काम केले. पण गेल्या दोन वर्षांपासून नवीन पिढी पुढे आल्यानंतर जुन्या कार्यकर्त्यांचा पूर्णपणे अवमान केला गेला. मानाचा मोठेपणा करूनही आमचा विचार केला जात नव्हता. पक्षात राहूनही आवाज दाबला जात होता. अशा ठिकाणी का राहायचे?”
ते पुढे म्हणाले, “माझ्यासोबत असंख्य कार्यकर्ते आहेत. ये तो झांकी है, अभी तो बहुत कुछ बाकी है. पुढील काळात कोलाडमध्ये मोठे राजकीय बदल दिसतील.”
महाबळे यांच्या या गर्जनेने कार्यक्रमात उपस्थितांना चैतन्य मिळाल्याचे दृश्य पहायला मिळाले.
कोलाडचे राजकारण नव्या टप्प्यावर
महाबळे यांच्यासारखा अनुभवी आणि लोकप्रिय नेता शिंदे गटात गेल्यामुळे कोलाड तसेच संपूर्ण रोहा तालुक्यातील राजकीय समीकरणे आता नव्याने रचली जातील. तटकरे गटाच्या संघटनात्मक मांडणीवर याचा परिणाम होणार हे निश्चित मानले जात आहे.
आगामी नगरपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला मिळालेली ही बळकटी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. स्थानिक स्तरावर नव्या राजकीय रेषा आखल्या जात असून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
