उरणसह राज्यभरातील खासगी शाळा-क्लासेसचा नियमबाह्य उपद्रव; विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका, शिक्षण विभागाचे मौन
उरण | घनःश्याम कडू
विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी असलेल्या शैक्षणिक सहलींचे स्वरूप बदलत जाऊन त्या ‘रिसॉर्ट सफरी’मध्ये परिवर्तित झाल्याचे गंभीर चित्र उरणसह राज्यभरात दिसत आहे. शाळा आणि क्लासेसनी विद्यार्थ्यांना गड-किल्ले, विज्ञानकेंद्र, संग्रहालये किंवा ऐतिहासिक स्थळांच्या ऐवजी वॉटर पार्क, रिसॉर्ट आणि मनोरंजन स्थळांवर घेऊन जाण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. या सर्व प्रकारांची कोणतीही नोंद न घेत शिक्षण विभाग शांत बसल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
अलीकडेच अकोल्यातील एका खाजगी क्लासने १३ विद्यार्थ्यांसह काशीद समुद्रकिनारी सहल काढली होती. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने एका शिक्षकासह एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाला. हा हादरवून टाकणारा प्रकार घडूनही शिक्षण विभागाने अशा सहलींवर नियंत्रण आणण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत.
उरणमध्येही ‘रिसॉर्ट सफरी’चा ट्रेंड वाढला
उरण तालुक्यातील अनेक खासगी शाळा व क्लासेस शैक्षणिक सहलींच्या नावाखाली रिसॉर्ट, साहसी पर्यटन स्थळे आणि वॉटर पार्क येथे विद्यार्थ्यांना नेत आहेत. नियमांनुसार शैक्षणिक सहली ज्ञानवर्धक स्थळांवर असणे आवश्यक आहे; मात्र प्रत्यक्षात अनेक शिक्षक व शाळा ‘कमिशन’ मिळणाऱ्या ठिकाणांकडे विद्यार्थी वळवत असल्याची माहिती समोर येते.
या सहलींसाठी पालकांकडून आकारले जाणारे शुल्कही अव्वाच्या सव्वा असून, सुरक्षा उपाययोजना, प्रशिक्षित मार्गदर्शक किंवा योग्य पर्यवेक्षण यांची कमतरता ठळकपणे जाणवते. त्यामुळे अशा सहली विद्यार्थ्यांच्या जीवाशी थेट खेळ करणाऱ्या ठरत असल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे.
पत्रकार संघाची कारवाईची मागणी
उरण तालुका मराठी पत्रकार संघाने या सर्व प्रकारांविरोधात वारंवार तक्रारी केल्या असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताशी खेळ करणाऱ्या तसेच नियमांचे उल्लंघन करून धोकादायक सहली काढणाऱ्या शाळा व क्लासेसवर तातडीची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गटशिक्षणाधिकारी घरत मॅडम व गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.
“शैक्षणिक सहलींचे रूपांतर मनोरंजन व्यवसायात झाले असताना शिक्षण विभाग केव्हा जागा होणार?” असा सवाल पालकांना पडला आहे.
