रेवदंडा | सचिन मयेकर
रेवदंडा पोलिसांनी दाखवलेल्या तत्परता आणि अचूक गुप्त माहितीच्या आधारे स्वतःच्या रूम पार्टनरचा मुद्देमाल चोरून दिल्लीला पसार होण्याच्या तयारीत असलेला एक चोरटा थेट मिनिडोर रिक्षामधूनच बेड्या ठोकून अटक करण्यात आली. या धडाकेबाज कारवाईची परिसरात मोठी चर्चाच सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ५ नोव्हेंबर २०२५ रोजी येसदे (ता. मुरुड) येथील महावीर वाटिका रूम नं. १०१ मध्ये राहत असलेल्या फिर्यादी हरीशसिंह यांच्या रूम पार्टनरनेच विश्वासघाताचा मार्ग निवडला. फिर्यादी सकाळी कामावर गेल्यानंतर आरोपी भरत विनायककुमार वीज (रा. दिल्ली) याने संधी साधून कॅननचा कॅमेरा आणि ओप्पो मोबाईल असा एकूण ₹१,३२,०००/- किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
दोघेही सिद्धांत हॉटेलमध्ये काम करत होते. काही दिवसांपूर्वीच भरतने नोकरी सोडली होती आणि दुसऱ्याच दिवशी दिल्लीला निघण्याची त्याची तयारी सुरू होती. यावरून त्याने चोरीचा डाव आधीपासूनच आखला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. फिर्यादी परत आल्यानंतर बॅगमधील मौल्यवान वस्तू गायब असल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ रेवदंडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.
तक्रार मिळताच सपोनि श्रीकांत किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. मनीष ठाकूर, सहायक फौजदार सुर्वे, पोसई म्हशीलकर, पो.ह. राठोड यांनी विशेष तपास पथक तयार केले. गुप्त माहितीच्या आधारे आरोपी मिनिडोर रिक्षामधून अलिबागकडे रवाना झाल्याचे समोर आले. पोलिसांनी तत्काळ सापळा रचत मिनिडोर रिक्षा थांबवली आणि आरोपीला ताब्यात घेत चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला.
या प्रकरणी गुन्हा क्र. १६२/२०२५, कलम BNS ३०५(A) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक फौजदार सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. संपूर्ण कारवाई मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती माया मोरे आणि सपोनि श्रीकांत किरवले यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.
नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक
रेवदंडा पोलिसांच्या या चपळ आणि परिणामकारक कारवाईचे स्थानिक नागरिकांनी कौतुक केले आहे. “रेवदंडा पोलिसांनी गुन्हेगारांना स्पष्ट संदेश दिला — गुन्हा केला तर सुटका नाही,” अशा प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहेत.
