महाविकास आघाडीतूनच लढणार; शेकापशी सकारात्मक चर्चा — प्रसाद भोईर
अलिबाग | सचिन पावशे
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने स्पष्ट भूमिका घेत महाविकास आघाडीतूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे पक्षाचे संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
अलिबाग येथे झालेल्या पत्रकार परिषदेत प्रसाद भोईर यांनी सांगितले की, नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीतूनच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी पक्षाची तयारी पूर्ण झाली असून उमेदवारांच्या पडताळणीसाठी आढावा बैठक घेण्यात आली आहे. अलिबाग नगरपरिषदेच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी गेल्या काही वर्षांत चांगली कामगिरी केली असून त्यातील तीन ते चार सक्षम उमेदवारांचा विचार करून हक्काचे प्रतिनिधित्व देण्यात येईल, अशी भूमिका पक्षाची आहे.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींनी दिले असून त्यानुसार अलिबाग नगरपरिषदेतील जागांबाबत शे.का.पा.च्या नेत्यांशी सकारात्मक चर्चा सुरू आहे. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील तसेच अलिबाग नगरपरिषदेतील स्थानिक नेत्यांसोबत बैठक झाली असून वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत. मतदारांची मानसिकता, विकासकामे आणि स्थानिक कार्यकर्त्यांचे योगदान लक्षात घेऊन उमेदवारांची निवड केली जाईल, असेही भोईर यांनी स्पष्ट केले.
अलिबाग नगरपरिषदेतील नऊ ते दहा इच्छुक उमेदवारांनी सक्रियपणे काम केले असून त्यांच्या कामगिरीच्या आधारे पक्ष योग्य उमेदवार निश्चित करणार आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित शक्तीने निवडणूक लढवून सत्ता स्थापनेचा विश्वास आम्हाला आहे, असे प्रसाद भोईर यांनी सांगितले. त्यांनी पुढे म्हटले की, अलिबाग नगरपरिषदेतील जागांसाठी वाटाघाटी सकारात्मक दिशेने सुरू असून लवकरच आघाडीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल.
या पत्रकार परिषदेत शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, सतीश पाटील, संदीप पालकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. महाविकास आघाडीतूनच निवडणूक लढवण्याचा हा निर्णय अलिबागमधील राजकीय समीकरणांना नवे वळण देणारा ठरणार असून, आगामी नगरपरिषद निवडणुकीत आघाडीतील जागा वाटपाचा निकालच स्थानिक राजकारणाचे भविष्य ठरवणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
