• Tue. Dec 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सत्ताधाऱ्यांचा जिल्हा, पण युतीचा गोंधळ कायम! रायगड निवडणुकीत वेगळीच लढत

ByEditor

Nov 8, 2025

नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचं वर्चस्व; भाजप केवळ तीन ठिकाणीच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार देणार?

रायगड । विशेष प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी सोमवार, १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप केवळ तीन नगरपरिषदांमध्ये – पेण, अलिबाग आणि उरण येथेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार देणार असल्याचे समजते, तर उर्वरित सात ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चा प्रभाव स्पष्टपणे जाणवत आहे. या घडामोडींमुळे रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीचाच बोलबाला असल्याचे सध्याचे चित्र आहे.

रायगड जिल्ह्यातील उरण, कर्जत, माथेरान, खोपोली, पेण, अलिबाग, रोहा, श्रीवर्धन, महाड आणि मुरुड या दहा नगरपरिषदांच्या निवडणुका होणार आहेत. जिल्ह्यात उरणचे महेश बालदी, पनवेलचे प्रशांत ठाकूर, पेणचे रवी पाटील हे भाजप आमदार आहेत. तर कर्जत-खालापूरचे महेंद्र थोरवे, अलिबागचे महेंद्र दळवी आणि महाड-माणगाव-पोलादपूर मतदारसंघाचे भरत गोगावले हे शिवसेना (शिंदे गट)चे आमदार आहेत. श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या आमदार आदिती तटकरे, तसेच रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांचा प्रभाव आहे. याशिवाय मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट)चे खासदार श्रीरंग बारणे आहेत.

सत्ताधारी पक्षांचे सर्व आमदार आणि खासदार रायगड जिल्ह्यात असतानाही, या नगरपरिषद निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे स्वतंत्रपणे लढण्याचा कल दाखवत आहेत. त्यामुळे रायगडमध्ये शिवसेना (शिंदे गट)विरोधात भाजपा–राष्ट्रवादी अशी संभाव्य युती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या लढतीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शेतकरी कामगार पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाही राहणार आहे.

रायगड जिल्ह्यातील सात नगरपरिषदांसाठी महाड, श्रीवर्धन, रोहा, मुरुड, खोपोली, कर्जत आणि माथेरान येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उमेदवार देणार आहे. या नगरपरिषदांच्या निवडणुकीत खासदार सुनील तटकरे यांचा निर्णय निर्णायक ठरणार आहे. दुसरीकडे पेण, अलिबाग आणि उरण या तीन ठिकाणी भाजपा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार देण्यास सज्ज आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, आगामी निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतरही रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि खासदार सुनील तटकरे यांचा प्रभाव ठळकपणे जाणवणार आहे. जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपाचा गुप्त समझोता दिसत असून, यामुळे शिवसेना (शिंदे गट) समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!