सतरा ते अठरा वर्षांपासून रखडलेले काम; कोटींचा खर्च वाऱ्यावर
कोलाड | विश्वास निकम
मागील सतरा ते अठरा वर्षांपासून रखडलेला मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक ६६) परतीच्या पावसामुळे अक्षरशः खड्ड्यांनी भरून गेला आहे. खांब–कोलाड–तळवली–तिसे–भुवन–इंदापूरदरम्यान मोठमोठे खड्डे पडल्याने प्रवासी आणि वाहनचालकांचे हाल होत आहेत. इतकेच नव्हे, तर या खड्ड्यांमध्ये आता वाहनेच अडकून बंद पडू लागली असून, अपघातांच्या घटनाही वाढल्या आहेत.
महामार्ग खड्ड्यांनी झाकोळला!
खांब येथील दीपक धाबा ते गोमंतक हॉटेल, महिसदरा नदीवरील पूल, कुंडलिका नदीवरील पूल, कोलाड बाजारपेठ व पोस्ट ऑफिस समोर, तिसे, तळवली, भुवन, इंदापूर या ठिकाणी रस्त्याला जीवघेणे खड्डे पडले आहेत. या मार्गावर प्रवास करणे म्हणजे प्रवाशांसाठी अक्षरशः “तारेवरची कसरत” ठरत आहे.
अनेक वाहनं खड्ड्यांत अडकून बंद पडत असून, स्थानिक आणि बाहेरील प्रवाशांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

“डेडलाईन मागोमाग डेडलाईन — पण काम जैसे थे!”
महामार्गाची पाहणी करण्यासाठी मंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, आणि विविध नेतेमंडळींनी अनेकदा दौरे केले, डेडलाईन दिल्या; मात्र प्रत्यक्षात काम आजतागायत रखडलेलेच आहे.
नागरिकांचा प्रश्न — “महामार्ग पाहणीला येणारे अजून किती मंत्री शिल्लक आहेत?”
अनेक ठेकेदारांनी या महामार्गाचे काम हाती घेतले, परंतु कोटीच्या कोटी रुपये खर्चूनही काम अपूर्णच आहे. काही ठिकाणी गटारे, सर्व्हिस रोड आणि पाण्याच्या लाईनची कामे अर्धवट राहिली असून, या अपूर्ण कामांमुळेच अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
“ठेकेदारांचा आडमुठेपणा आणि शासनाची बेपर्वाई”
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ठेकेदारांच्या आडमुठेपणामुळे आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे महामार्गाची दुर्दशा झाली आहे. शासनाने ठेकेदारांवर कोणताही वचक ठेवलेला नाही, अशी टीका केली जात आहे.
खांब, नागोठणे, कोलाड, आंबेवाडी नाका, तळवली, तिसे या परिसरात महामार्गाची अक्षरशः चाळण झाली असून, प्रत्येक पावसात नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.
“रायगडला वाली कोण?”
रायगड जिल्ह्यात सध्या पालकमंत्री नसल्याने देखरेख आणि जबाबदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. “रायगडच्या हद्दीत वडखळ ते इंदापूरदरम्यान रस्त्याची ही अवस्था, आणि जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
अनेक वर्षे थांबलेला महामार्गाचा चौपदरीकरण प्रकल्प तातडीने पूर्ण करून, पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी ठाम मागणी प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे. “आता आश्वासनं नव्हे, प्रत्यक्ष काम दिसलं पाहिजे,” असा इशारा नागरिक देत आहेत.
