श्रीवर्धन तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का; कोळंबेकर दांपत्यांचा शिंदे गटात प्रवेश
श्रीवर्धन | अनिकेत मोहित
श्रीवर्धन तालुक्यातील राजकारणाला नवं वळण देणारी घटना आज घडली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला असून, महिला व बालकल्याण सभापतीपद भूषवलेल्या अक्षदा कोळंबेकर आणि माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी तालुकाप्रमुख अविनाश कोळंबेकर यांनी समर्थकांसह शिवसेना (शिंदे गटात) जाहीर प्रवेश केला.
हा पक्षप्रवेश सोहळा रानवली येथील पटांगणावर उत्साहात पार पडला. या वेळी राज्याचे उद्योग मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे गटाचा राजीनामा देत शिंदे गटात प्रवेश केला. सोहळ्याला सहसंपर्कप्रमुख चंद्रकांत कळंबे, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, तालुकाप्रमुख सुरेश मिरगळ, सचिन पाटेकर, रवींद्र लाड, सुरेश महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.
“श्रीवर्धनचा निर्णय जनता घेणार” -मंत्री भरतशेठ गोगावले
या प्रसंगी भाषण करताना मंत्री गोगावले म्हणाले, “हा पक्षप्रवेश श्रीवर्धन तालुक्याच्या राजकारणाला नवं वळण देणार आहे. आम्ही कधी खोटं बोललो नाही, चुकीचं केलं नाही. शेतकऱ्याचा मुलगा असल्याने आमचं मन मोठं आहे. गरीबांचा आशीर्वाद हेच आमचं बळ आहे.”
महात्मा फुले आरोग्य योजनेबाबत बोलताना त्यांनी सांगितले, “या योजनेची मर्यादा सध्याच्या पाच लाखांवरून आणखी वाढवण्याचा विचार सुरू आहे.”
तसेच, रोजगार हमी योजनेंतर्गत २६४ नवे प्रकल्प सुरू करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
बॉक्साईट प्रकल्प संदर्भात त्यांनी इशारा देत म्हटले, “ते चांगल्या रीतीने वागले तर ठीक, नाहीतर त्यांचा जय हरी करायला वेळ लागणार नाही.”
“महायुतीसाठी सज्ज, पण जनता ठरवेल श्रीवर्धनचं भविष्य”
आगामी निवडणुकांवर भाष्य करताना गोगावले म्हणाले, “पहिला प्रस्ताव महायुतीचा आहे. ज्याची जशी ताकद तसं वाटप होईल. श्रीवर्धन ही कोणाची खासगी मालमत्ता नाही, श्रीवर्धनचा निर्णय जनता घेणार आहे. युती झाली तरी ठीक, नाही झाली तरी आम्ही सज्ज आहोत.”
मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या सततच्या दौऱ्यांमुळे, तसेच कार्यकर्त्यांशी थेट संवादाच्या माध्यमातून श्रीवर्धन तालुक्यात शिंदे गटात नवचैतन्य निर्माण झालं आहे. कोळंबेकर दांपत्याच्या प्रवेशानंतर या भागात नव्या राजकीय समीकरणांची चाहूल लागली आहे.
