• Tue. Dec 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणमधील शिक्षकाचा विकृत चेहरा उघड; मेहुण्याच्या पत्नीवर अत्याचार

ByEditor

Nov 8, 2025

फिरायला बोलावून महिलेला अनोळखींच्या तावडीत सोपवल्याचा आरोप

उरण । घन:श्याम कडू

शिक्षक ही समाजातील सर्वाधिक सन्माननीय भूमिका मानली जाते; मात्र उरण तालुक्यातील एका शिक्षकानेच या पदाचे पावित्र्य कलंकित केले आहे. जासई येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल मधील शिक्षक सुहास शिंदे या नराधमावर स्वतःच्या मेहुण्याच्या पत्नीचा विनयभंग, शिवीगाळ, मारहाण तसेच अनोळखी व्यक्तींमार्फत बळजबरीने अत्याचार करवून घेतल्याचा धक्कादायक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्हावा शेवा पोलिस ठाण्यात या शिक्षकासह त्याची पत्नी, मेव्हणा आणि दोन अनोळखी व्यक्ती अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा क्रमांक 80/2025 अंतर्गत कलम 351(2), 3(5), 115(2), 64(1), 70(1), 74(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक मोनाली चौधरी करीत आहेत.

फिरायला बोलावून अत्याचार

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुहास शिंदे याने आपल्या मेहुण्याच्या पत्नीला व नातेवाईकांना “मुंबई फिरायला” म्हणून बोलावले. मात्र, फिरायला नेण्याऐवजी त्याने त्यांना उरण येथील जे.एन.पी.ए. कामगार वसाहतीतील भाड्याच्या घरात आणले. तिथे या शिक्षकाने संबंधित महिलेला विनयभंग, शिवीगाळ आणि मारहाण केली. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर रात्री दहा ते अकरा वाजताच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्तींना पैसे घेऊन घरात बोलावले आणि त्या महिलेला त्यांच्या तावडीत सोपवले, असा भयंकर आरोप फिर्यादी महिलेनं केला आहे.

या प्रकरणाची साक्ष महिलेची नणंद असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. आरोपींमध्ये सुहास शिंदे, प्रविण राजाराम गजांकूश आणि दोन अनोळखी व्यक्तींचा समावेश आहे. न्हावा शेवा पोलिसांनी या पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली आहे. तथापि, अद्याप कोणालाही अटक झालेली नाही, अशी माहिती तपास अधिकारी चौधरी यांनी दिली.

महिला फिर्यादीविरुद्ध चोरी आणि फसवणुकीचा गुन्हा; तरी जनमत संतप्त

दरम्यान, आरोपींकडून फिर्यादी महिलेविरुद्ध सातारा जिल्ह्यातील शाहू पोलिस ठाण्यात चोरी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे. मात्र, या तक्रारीचा आधार घेऊन महिलेकडून करण्यात आलेल्या गंभीर आरोपांचे महत्त्व कमी करता येणार नाही, असा जनमतातील ठाम सूर आहे.

या प्रकरणानंतर उरणच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ माजली असून, नागरिक आणि पालक वर्गामध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. शिक्षकासारख्या जबाबदार पदावरील व्यक्तीकडून अशा कृत्याची अपेक्षा नसल्याने सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे.
“विद्यार्थ्यांना संस्कार देणारा शिक्षकच राक्षसी कृत्य करतो, तर समाजाचं भविष्य कोण घडवणार?” असा जळजळीत सवाल उरणभर गुंजत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!