वनविभाग आणि सामाजिक संस्थेचा संयुक्त जनजागृती उपक्रम — “बिबट्या वैरी नव्हे, तर शेजारी”
कोलाड | विश्वास निकम
उडदवणे ते बाहे या गावांच्या दरम्यान काही दिवसांपूर्वी बिबट्याचे दर्शन झाल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी तातडीने भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तपासादरम्यान बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आल्याने परिसरात त्याची उपस्थिती निश्चित झाली आहे.
या पार्श्वभूमीवर वनविभाग, रोहा आणि सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था, रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच बाहे गावात “बिबट्या वैरी नव्हे तर शेजारी” या विषयावर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
गावकऱ्यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी वनविभागाच्या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमादरम्यान बिबट्याचे नैसर्गिक वर्तन, तो मानवावर सहजपणे हल्ला करत नाही, त्याच्याशी सहजीवन कसे साधावे यासह सुरक्षिततेसाठी आवश्यक खबरदारीचे उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बिबट्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून गावकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे, तसेच रात्री एकटे बाहेर न पडणे, घराजवळील परिसर प्रकाशमान ठेवणे आणि जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधणे, या सूचनांचे पालन करावे.
या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांमध्ये वन्यजीवांविषयी जागरूकता वाढली असून, “बिबट्या हा वैरी नसून निसर्गाचा घटक आहे” हा संदेश समाजात पोहोचल्याचे समाधान वनविभागाकडून व्यक्त करण्यात आले.
